मुंबई - भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्या प्रित्यर्थ केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा मोहिम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी काल या मोहिमेवर टीका करताना काल या मोहिमेचा फालतूगिरी असा उल्लेख केला होता. आता अमोल मिटकरी यांच्या या विधानावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तिरंग्यास फालुगिरी म्हणणं ही राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
अमोल मिटकरींच्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशातील जनता उत्साहाने साजरी करत आहे. या उत्साहावर मिठाचा खडा टाकणाऱ्यांचा राष्ट्रद्रोह राष्ट्रद्वेश समोर आला आहे. हर घर तिरंगा हा काही भाजपाचा कार्यक्रम नाही आहे. तर देशातील कोट्यवधी लोकांच्या प्रतिसादामुळे हा देशभरातील सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम झाला आहे. मात्र या राज्यातील राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी तिरंग्यास फालतुगिरी असा शब्दप्रयोग केला आहे. तिरंग्यास फालतुगिरी हा शब्द वापरून त्यांनी त्यांची राष्ट्रविरोधी मानसिकताच दाखवून दिली आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, खरं म्हणजे २४ तासांनंतर आम्ही माध्यमांसमोर आलो, कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या प्रवक्त्यावर कारवाई करतील, असं वाटलं होतं. मात्र गेल्या २४ तासांत याबद्दल त्यांनी चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे तिरंग्यास फालतुगिरी म्हणणं ही राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे का, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
खरं तर तिरंगा मोहिम ही आज देशाची मोहीम बनली आहे. संपूर्ण देश हा सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र राष्ट्रहिताच्या कोणत्याही गोष्टीस केवळ नावापुरत्या राष्ट्रवादी असलेल्या साडेतीन जिल्ह्यातच अस्तित्व असलेल्या या पक्षाचे अध्यक्ष आपल्या पाळीव पोपटाद्वारे राष्ट्रद्वेषाची गरळ ओकत आहेत का? हा खरा प्रश्न आहे, असा सवालही त्यांनी विचारला.
राष्ट्रध्वज, तिरंगा हा राष्ट्रीय सोहळा आहे. पण राष्ट्रीय सोहळ्याला विरोध करून आपला राष्ट्रविरोधी राजकारणाचा खरा चेहरा राष्ट्रवादी जनतेसमोर सादर करतोय का, हा खरा प्रश्न आहे. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अशी भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दाऊद इब्राहिमची मालमत्ता खरेदी करणाऱ्या नवाब मलिक यांचं राष्ट्रवादी काँग्रेसने ते तुरुंगात जाईपर्यंत समर्थन केलं होतं. अजूनही त्यांचं समर्थन करत आहेत. तर मुंब्रा येथील दहशतवादी इशरत जहाँ हिच्या समर्थनासाठी निधी गोळा करण्याचं काम, त्यामाध्यमातून तिला देशभक्त ठरवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केलं होते. त्यामुळे दाऊदचं समर्थन करणाऱ्या नवाब मलिक यांचं समर्थन, इशरत जहाँच्या समर्थनासाठी निधी गोळा करणे आणि आता तिरंग्याला फालतुगिरी म्हणणं, यातून देशविरोधी कृती राष्ट्रवादी काँग्रेस करत आहेत, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते केशप उध्ये यांनी केला.
मिटकरी असो वा आव्हाड असो, त्यांच्या तोंडातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच बोलत असतात. त्यामुळेच गेल्या २४ तासांत ते या विषयावर एकही शब्द बोलले नाहीत. जनता अशा राष्ट्रविरोधी मानसिकतेला स्थान देणार नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या मिटकरी यांच्या वक्तव्यावर शरद पवार मौन का, जयंत पाटील मौन का? का राष्ट्रवादीची हीच अधिकृत भूमिका आहे. तिरंग्याला फालतुगिरी म्हणणं हीच राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे, असा प्रश्न राज्यातील जनता विचारत आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले.