Nana Patole, Modi: "पंजाबमध्ये फसलेला कट महाराष्ट्रात शिजतोय का?..."; काँग्रेस, राहुल गांधीना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:13 PM2022-01-18T19:13:33+5:302022-01-18T19:14:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याच्या कटात राहुल गांधीची मूक संमती आहे का?, असाही केला सवाल
Chitra Wagh Reaction: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले हे गेल्या दोन-चार दिवसांपासून वादग्रस्त कारणामुळे चर्चेत आहेत. 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो', असं विधान त्यांनी एका जाहीर शब्दात केलं होतं. त्यावरून पटोलेंवर टीका झाली आणि त्यांनी विधानाबाबत ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं. 'मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून मी माझ्या मतदारसंघातील एका मोदी नावाच्या गुंडाबद्दल बोललो होतो, असं स्पष्टीकरण त्यांनी ट्वीट करून दिलं. पण हे स्पष्टीकरण खोटेपणाचं असल्याचा दावा भाजपने केला. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही पटोलेंसह काँग्रेस आणि राहुल गांधींना काही रोखठोक सवाल केले.
"नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्व गप्प का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याच्या कटात राहुल गांधीची मूक संमती आहे का? भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या पोलिसांवर आमचा विश्वास नाही. पंजाबमध्ये फसलेला कट महाराष्ट्रात शिजतोय का? याचा तपास केंद्रीय एजन्सी मार्फत करावा", असे काही प्रश्न विचारत चित्रा वाघ यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्व गप्प का?@narendramodi यांना मारण्याच्या कटात राहुल गांधीची मूक संमती आहे का?#BJP कार्यकर्त्यांना ताब्यात घेणा-या #MVA पोलिसांवर आमचा विश्वास नाही
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 18, 2022
पंजाबमध्ये फसलेला कट महाराष्ट्रात शिजतोय का?
याचा तपास केंद्रीय एजन्सी मार्फत करावा
दरम्यान, 'मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे, असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केला. ‘नाना पटोलेंनी त्या गावगुंडाचा फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी', असं खुलं आव्हानदेखील माधव भांडारी यांनी दिलं. "स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष वापरत नाहीत, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतात, ही वस्तुस्थिती भयावह आहे", अशी टीकाही भाजपकडून करण्यात आली.