बुलढाणा : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य करुन नवा वाद ओढवून घेतला आहे. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरुन आता विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीही प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. प्रसाद लाड हे पाकिस्तानात जन्माला आले का? हे तपासावे लागेल, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याची व चिखलफेक करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत असताना दुसरीकडे हे वाचाळवीर पक्षाला अडचणीत आणून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या प्रसाद लाडांचा जन्म पाकिस्तानात झाला वाटतं. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला हे माहीत नाही, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्यानेही संजय गायकवाड आक्रमक झाले. बापाच्या नावाचाही एकेरी शब्दात उल्लेख करता का? असा सवाल रावसाहेब दानवे यांना आमदार गायकवाड यांनी केला आहे. याशिवाय, संजय गायकवाड यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून सुरु असलेल्या मुद्द्यांवरून संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांच्या फालतू प्रश्नांना उत्तर देण्यासाठी बसलेले नाहीत, तर काम करण्यासाठी बसलेले आहेत. तसेच, सीमाभागात घडलेल्या काही घडामोडींबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काम करून दाखवतील, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
याचबरोबर, आज मुंबई येथे उद्धव ठाकरे आणि वंचितमध्ये युतीची बैठक होत आहे, या संदर्भात संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित अशा चार पक्षांची युती आपल्याला पकडावी लागेल. तसेच, वंचितचे नेते यांनी जाहीरपणे सांगतात की ,आम्ही राष्ट्रवादी किंवा शरद पवारांसोबत आणि मराठ्यांच्या पक्षासोबत कधीही जाणार नाही. आता ती ही सगळी गणिते भविष्यात कशी बसवतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे, असे संजय गायकवाड म्हणाले.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचे विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान त्यांनी केले. स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल... पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणाले. दरम्यान, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या व्यक्तींनी केला. महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, असे त्यांनी म्हटले. त्यावर आपलं वाक्य करेक्ट न करताच सारवासारव करताना शिवरायांचे बालपण रायगडावर गेले, असे प्रसाद लाड म्हणाले. छत्रपती शिवरायांनी रायगडावरच स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथूनच त्यांच्या शौर्याची सुरुवात झाली, असोही लाड म्हणाले.