मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आज राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. तसेच नुकत्याच काही जातींच्या ओबीसींमध्ये केलेल्या समावेशावरून राज्य सरकार आणि ओबीसी नेत्यांवर तोफ डागली. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करण्यास विरोध करणारे आता सरकारने १६-१७ जातींची ओबीसींमध्ये समावेश केल्यानंतर काही का बोलले नाहीत, आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसला नाही का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
राज्य सरकारने नुकत्याच काही जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून राज्य सरकार आणि ओबीसी नेत्यांवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही ओबीसींमधून आरक्षण मागितलं तेव्हा तुम्ही आमच्या ताटात येऊ नका. तुम्ही आमच्या ताटात आलात तर आमचं आरक्षण संपतंय. ओबीसी आरक्षणामध्ये आधीच चारशे-साडेचारशे जाती आहेत, असं सांगितलं गेलं. मात्र सरकारने काल परवा १७ मोठाल्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या. आता तुम्हाला धक्का बसला नाही का? मराठ्यांचा ओबीसींमध्ये समावेश करण्याची मागणी केल्यावर आरक्षणाला धक्का लागला म्हणणारा कुठे आहे. इतका द्वेष मराठ्यांचा का करताय? आता त्या १७ जाती घालताना गोरगरीब ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसत नाही का? असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.
ते पुढे म्हणले की, ज्यावेळेस आपण ओबीसींमधून आरक्षण मागत होतो, तेव्हा यांनी सांगितलं की आम्हाला धक्का लागतोय, आमच्यात येऊ नका. आता यांनी ओबीसींमध्ये १६-१७ जाती घातल्या. आता एकही कुणी बोलायला तयार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला जर ओबीसींमधून आरक्षण हवं तर महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, असं आम्हाला सांगितलं गेलं. आता १७ जाती ओबीसींमध्ये समाविष्ट करताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं का? अशी विचारणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच आता तुमच्या लेकरांचे मुडदे कोण पाडतंय, ते पाहा, असं आवाहनही मराठा समाजाला केलं.
आणखी एक बाब म्हणजे तुम्ही कितीही आंदोलनं करा, किहीती झुंजा, कितीही कोटीच्या संख्येनं एकत्र या. आम्ही तुमच्या नाकावर टिच्चून निर्णय घेतला, असं दाखवण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. त्यामुळे यांना उखडून फेकावंच लागणार आहे. आपल्या डोळ्यादेखत अन्याय करत असतील तर त्यांना उखडून फेकावंच लागणार आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.