राष्ट्रवादीचे मंत्रीच नाराज? मिळाले राज्यमंत्र्यांचे बंगले; अजित पवार सोडून सगळे...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 09:08 PM2023-07-12T21:08:55+5:302023-07-12T21:09:58+5:30
दोघांच्या सरकारमध्ये तिसरा पक्ष सहभागी झाला आणि तीन तिघाडा, काम बिघाडा अशी परिस्थिती उद्भवली आहे.
भाजपाने एकनाथ शिंदेंसोबत सरकार स्थापन करून झाल्यावर वर्षाने राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासोबतच बंगल्यांच्या वाटणीवरून तिन्ही पक्षांच्या आमदारांत नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना महत्वाची खाती जाऊ नयेत यासाठी शिंदे गट दबाव आणत आहे. तर मंत्रिपदे वाटली गेल्याने शिवसेना आणि भाजपाचे इच्छुक आमदार नाराज आहेत. असे असताना राष्ट्रवादीचेच आमदार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दोघांच्या सरकारमध्ये तिसरा पक्ष सहभागी झाला आणि तीन तिघाडा, काम बिघाडा अशी परिस्थिती उद्भवली आहे. वर्षभरापासून मंत्रिपदाचे बाशिंग बांधुन असलेल्या शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे राष्ट्रवादीला महत्वाची खाती जाऊ नयेत म्हणून शिंदे प्रयत्न करत आहेत. कारण त्यांनी अजित पवारांचे कारण सांगूनच उद्धव ठाकरे सरकार पाडले होते.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दालने आणि निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. परंतू, या मंत्र्यांना राज्यमंत्र्यांच्या दर्जाची निवासस्थाने देण्यात आल्याने नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राजकारणात कोणाला कोणता बंगला मिळतो यावरून देखील त्या नेत्याचे वजन ठरत असते.
मंत्रिपदाची शपथ घेऊन बारा दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही खाते वाटप झालेलं नाही. अजित पवार हे आज दिल्लीत पोहोचले आहेत. तर शिंदे आणि फडणवीस नंतर निघाले आहेत. अमित शहांशी या नेत्यांच्या वाटाघाटी होतील. परंतू, वजनदार नेत्यांना तेवढ्या ताकदीचे बंगले न मिळाल्याने इकडे नाराजी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री किंवा कमी महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्र्यांना जी निवासस्थाने दिली गेली होती ती राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत.
दिलीप वळसे पाटलांना मविआच्या काळात गुलाबरावांना देण्यात आलेला सुवर्णगड देण्यात आला आहे. यापूर्वी तो अनेक राज्यमंत्र्यांना दिला जायचा. छगन भुजबळ यांना सिद्धगड देण्यात आला आहे. मविआत तो यशोमती ठाकूर यांना तर त्यापूर्वी राज्यमंत्र्यांना दिला जायचा. हसन मुश्रीफ यांना राज्यमंत्र्यांना दिला जाणारा विशाळगड देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांना राज्यमंत्र्यांना दिले गेलेले प्रचितगड निवासस्थान देण्यात आले आहे. धर्मरावबाबा आत्राम यांचे दु:ख वेगळेच आहे. त्यांना सुरुची इमारतीत सदनिका देण्यात आली आहे.
अनिल पाटील यांना देखील सदनिका देण्यात आली आहे. इथे प्रामुख्याने आमदार आणि राज्यमंत्र्यांना राहण्यास दिले जाते. संजय बनसोडे यांना राज्यमंत्री असताना सुरुची इमारतीमध्ये निवासस्थान देण्यात आले होते. कॅबिनेट मंत्री झाल्यावरही त्यांना तेच देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे अजित पवारांना त्यांच्या पदाप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांना दिले जाणारे देवगिरी निवासस्थान देण्यात आले आहे.