Maharashtra Elections 2024: अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा विषय महाराष्ट्रात पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावरून महायुती सरकारला विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. संभाजीराजे भोसले यांनी अरबी समुद्रात स्मारकाचं ज्या ठिकाणी जलपूजन झाले, तिथे जाण्याची घोषणा केली. पण, त्यांना रोखण्यात आले. आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी महायुती सरकारला घेरले आहे.
"नर्मदा नदीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकास कोणत्याही अडचणी येत नाहीत पण अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकासच अडचणी का येतात?", सवाल आमदार रोहित पवारांनी यानिमित्ताने केला आहे.
"राज्यपाल-मुख्यमंत्र्यांना पत्र, पण उत्तर नाही"
रोहित पवार म्हणाले, "अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जलपूजन होऊन 8 वर्षे झाली तरी देखील स्मारकाची एक वीट देखील रचली गेली नाही. यासंदर्भात जुलै 2022 मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्र दिले पण त्यांचा काहीही प्रतिसाद आला नाही."
"वर्षभराने जुलै 2023 मध्ये तत्कालीन राज्यपाल महामहीम बैस साहेबांची भेट घेऊन त्यांना याविषयी लक्ष घालण्याची विनंती केली असता, त्यांनी मात्र मुख्य सचिवांना त्वरित लक्ष घालण्याचे आदेश दिले. परंतु तरीदेखील सरकारने आपली निष्क्रियता सोडलीच नाही. यावरून सरकार किती गंभीर आहे ते स्पष्ट होते", अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
कोणाचा दबाव तर नाही ना? रोहित पवारांचा सरकारला सवाल
रोहित पवारांनी पुढे म्हटले आहे की, "असो, राज्य सरकारने समन्वय साधला असता, तर स्मारक नक्कीच झाले असते ना? नर्मदा नदीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकास कोणत्याही अडचणी येत नाहीत; पण अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकासच अडचणी का येतात? हे स्मारक होऊ नये यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना? असे कितीतरी प्रश्न सर्वसामान्य शिवप्रेमींना पडल्याशिवाय राहत नाही. यावर सरकार उत्तर देईल, ही अपेक्षा."
विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी अडचणीचा मुद्दा
संभाजीराजे छत्रपती यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा मुद्दा पुढे आणला आहे. यावरून आता विरोधकही महायुतीला बोलताना दिसत आहे. विधानसभा निवडणूक काही आठवड्यांवर आलेली असताना हा मुद्दा पुढे आल्याने महायुती सरकारला अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. तशी चर्चा आता सुरू झाली आहे.