जालना – विरोधी पक्षनेता आणि विधिमंडळ हे न्यायमंदिर आहे. आता त्यांना स्वत:च्या जातीविषयी गर्व झालाय, असा घटनेतला विरोधी पक्षनेता असतो का? सरकारनं न्याय दिला नाही तर विरोधी पक्षनेता प्रचंड मोठा आवाज उठवतो आणि सरकारला झुकवतो. तुमचे विचार कसे पाहिजे, राहुल गांधींनी हे शिकवले का? मराठ्यांविरोधात आवाज उचलतो, त्यासाठी राहुल गांधींनी पद दिलंय का असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ तारखेनंतर सगळ्यांना दाखवतो, माझ्या गोरगरिब लेकरांना आरक्षण द्या, ही धमकी समजता का? मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणतात, राहुल गांधींनी मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी तुम्हाला पाठवले का? विरोधी पक्षनेता कुणाचा नसतो, तो जनतेचा आवाज असतो. क्षत्रीय मराठ्यांविरोधात बोलला तर तुझ्या पाठीवर थाप टाकू असं राहुल गांधींनी सांगितलंय का? आम्ही बोललो, धमकी कुठे दिली. सरकारला वाईट बोलले तर तुम्हाला काय झालं? तुमच्या राजकारणात आम्हाला का डाग लावताय? राजकारणासाठी करत असतो तर मराठवाड्याला आरक्षण मिळत असताना समितीला राज्यभरातील मराठ्यांसाठी काम करायला लावलं नसतं. माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच आम्ही हिरो झालो नाही, स्वत:ला हिरो मानत नाही. मराठ्यांनी आम्हाला स्वीकारले आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून आम्हाला मोडायला निघाले होते, आंदोलन संपवायचे होते. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. परंतु उभा हयातीत मराठ्यांमध्ये तुम्हाला संभ्रम निर्माण करता येणार नाही. तुमची पिढीसुद्धा मराठ्यात संभ्रम निर्माण करू शकत नाही. राजकारणासाठी कोण काय करतंय हे मराठ्यांना चांगले माहिती झाले आहे. तुमच्याबद्दल तर खूप झालंय, तुमचे सल्ले देण्याची गरज नाही. जालनात ओबीसीतून आरक्षण देण्याचं तुम्ही बोलला होता, परंतु तिथून निघाल्यावर सरड्यासारखा रंग बदलला हे मराठ्यांनी पाहिले, त्यामुळे आम्हाला तुम्ही सल्ले देऊ नका. असं प्रत्युत्तरही मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना दिले.
काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
जालनातील गोळीबारानंतर मनोज जरांगे पाटील हिरो झाले, त्यानंतर आता ज्या गोष्टी घडत आहेत. हम झुका सकते है अशा अर्विभावात समाजाचे पाठबळ मिळाल्यानं जरांगे पाटील यांना गर्व झाला, धमक्या द्यायला लागले. नाही केले तर बघून घेऊ, आम्हालाही धमक्या देतात असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला.
दरम्यान, मराठा समाजाला EWS मधून १० टक्के आरक्षणाचा फायदा होत असेल तर तो फार मोठा होतोय. परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उचलण्याचा हेतू असावा. ओबीसीत येऊन ३७२ जातींमध्ये समावेश करून त्यांना फार काही फायदा होणार नाही. खुल्या प्रवर्गात फार जाती राहणार नाहीत. यातून मराठा समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.