Jayant Patil Ajit Pawar: सिंचन चौकशीच्या फाईलवर आर. आर. पाटलांनी सही केली. माझा केसाने गळा कापला, असे अजित पवार म्हणाले. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
आज आर.आर. पाटील भूमिका मांडायला नाहीत. पण, त्यावेळच्या मंत्रिमंडळात मंत्री होतात. तुम्ही अजित पवारांचे आणि आर.आर. पाटलांचेही सहकारी होतात. नेक्की काय घडलं होतं? या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटलांनी दोन्ही नेत्यांना उलट सवाल करत घेरलं.
अजित पवारांची आर.आर. पाटलांवर टीका, जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील म्हणाले, "असं आहे की, आता आज आबा नाहीयेत. एखाद्या माणसाच्या निधनानंतर अशी गंभीर विधान त्यांच्याबद्दल करणं आणि त्या माणसाला आपली बाजू न मांडण्याची संधी न मिळणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. आबा किती स्वच्छ होते, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. डान्सबार बंद करण्यात आबांचा किती पुढाकार आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे."
"एकतर ते महाराष्ट्रातील लोकप्रिय गृहमंत्री होते. त्याच्या पुढे आलेल्या गोष्टीवर त्यांनी सही केली. त्यानंतर सरकार बदलल्यावर ज्यांनी सही केली; त्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सही केल्यावर, ती फाईल ज्यांच्यावर आरोप होते, त्यांना बोलवलं आणि फाईल दाखवली. म्हणजे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना बोलावून ती फाईल दाखवली. म्हणजे या राज्यात काय चाललंय?", असा सवाल जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना केला.
त्यांनी फडणवीसांनाही अडचणीत आणलं -जयंत पाटील
"मी आरोप करायचे, फाईल आल्यावर ज्याच्यावर आरोप केले, त्याला बोलवून ती दाखवायची. म्हणजे दोघांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा हा प्रकार आहे. स्वभाव कसा? अशी पद्धत असते का? ही स्टोरी त्यांनी एवढी सांगायची नव्हती. देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी अडचणीत आणलं. यामुळे ते दोघे कसे सच्चे मित्र आहेत, हे महाराष्ट्राला कळलं. त्यामुळे वारंवार तिकडे जाऊन शपथ घेण्याचा जो प्रयत्न आहे. मला वाटतं, तो त्याचाच एक भाग आहे", असे म्हणत जयंत पाटलांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना घेरलं.