- शीलेश शर्मा, नवी दिल्लीजून २००४मध्ये अहमदाबादेतील चकमकीत ठार झालेली इशरत जहाँ ही तरुणी लष्कर-ए-तोयबाची हस्तक होती, या डेव्हिड हेडली याच्या खुलाशानंतर काँग्रेस आणि भाजपात गुरुवारी नवे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.हेडलीच्या साक्षीनंतर इशरत जहाँ प्रकरणावरून भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांनी गुरुवारी परस्परांना लक्ष्य केले. खऱ्या चकमकीला ‘फेक’ ठरवण्याचा खटाटोप करणारा काँग्रेस पक्षच डेव्हिड हेडलीच्या साक्षीनंतर खोटा ठरला आहे, अशा शब्दांत भाजपाने काँग्रेसला लक्ष्य केले. भाजपाच्या या हल्ल्याला काँग्रेसनेही तत्काळ उत्तर दिले. केवळ हेडलीच्या साक्षीच्या आधारावर बनावट चकमकीला खरी ठरवता येणार नाही, असे काँग्रेसने म्हटले. हेडलीने खरोखरच अशी साक्ष दिली असेल तर मोदी सरकारने त्याची शहानिशा करण्यासाठी या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, असे आव्हानही काँग्रेसने दिले.अहमदाबादच्या कनिष्ठ न्यायालयाने इशरत जहाँ चकमक बनावट असल्याचे म्हटले होते. यानंतर उच्च न्यायालयानेही ही चकमक बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या निवाड्यानंतर केवळ हेडलीच्या साक्षीच्या आधारावर खोटी चकमक खरी ठरवण्याचा अधिकार भाजपाला नाही. भाजपाला इतकी घाई असेल तर त्यांनी हेडलीच्या जबानीच्या आधारावर कनिष्ठ व उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान द्यावे, असे माजी केंद्रीय मंत्री व काँगे्रस नेते मनीष तिवारी म्हणाले. या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या लोकांच्या पाठीशी भाजपाला उभे राहायचे आहे का? हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या प्रकरणी माफी मागण्याची मागणी करण्यापूर्वी भाजपाने स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.
इशरत जहाँवरून भाजपा-काँग्रेस आमने-सामने
By admin | Published: February 12, 2016 2:19 AM