मुंबई: शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांचा ईश्वर चिठ्ठीद्वारे भाजपाच्या अतुल शाह यांच्याकडून पराभव झाला. मात्र बागलकर हा परभाव स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांनी शहा यांना करण्यात आलेली बोगस मते कमी करण्यात यावीत व ‘टेंडर व्होट’ मोजून विजेता घोषित करावा, अशी मागणी करणारी निवडणूक याचिका लघुवाद न्यायालयात दाखल केली आहे. अतुल शाह यांना करण्यात आलेली बोगस मते वगळावी आणि या प्रभागातून केलेली पाच ‘टेंडर व्होट’ (एखादा मतदार मतदान केंद्रात गेल्यावर त्याला कळले की, त्याच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केले आहे तर ती व्यक्ती मतदान केंद्रातील अधिकाऱ्याला भेटून कागदपत्राद्वारे ओळख पटवून देते. अधिकाऱ्याला त्याचे म्हणणे पटले तर तो त्या मतदाराला बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्यास सांगतो) विजेता ठरवण्यासाठी मोजण्यात यावी, अशी मागणी बागलकर यांनी याचिकेद्वारे केली आहे. या प्रभागातील सर्व ईव्हीएम न्यायालयात आणून ती पुन्हा उघडावी आणि शाह यांच्या केलेली सर्व बोगस मते वगळण्यात यावीत. तसेच पाच ‘टेंडर व्होट’ कुणाच्या बाजूने आहेत, हे ही पाहावे, असे याचिकेत म्हटले आहे.‘टेंडर व्होट मोजण्याची तरतुद नसली तरी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अशा परिस्थितीत ‘टेंडर व्होट’ मोजण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे,’ असे याचिकेत नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
‘ईश्वर चिठ्ठी’ विरुद्ध बागलकर न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2017 5:57 AM