सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- केरळ येथून फरार असलेल्या आयएसआयच्या सदस्याला नेरूळमधून अटक करण्यात आली आहे. केरळ एटीएस व केरळ पोलिसांनी गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. केरळ येथून आलेला अर्चित कुरेशी (४५) हा आयएसआय एजंट नवी मुंबईत राहत असल्याची माहिती केरळ एटीएसला मिळाली होती. अनेक दिवसांपासून ते या दहशतवाद्याच्या शोधात होते. अखेर काही दिवसांपासून तो नेरूळ परिसरात राहत असल्याची माहिती केरळ एटीएसला मिळाली होती. यानुसार, त्याच्या शोधात केरळ एटीएस व केरळ पोलिसांचे एक पथक नवी मुंबईत दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्यांनी नेरूळ परिसरात झडती घेतली असता, एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीवूड्स येथे तो आढळला. त्याला सीबीडी न्यायालयात हजर करून केरळ एटीएसने त्याचा ताबा घेतला आहे, तर त्याच्या दुसऱ्या साथीदारालादेखील ठाणे परिसरातून अटक केल्याचे समजते.