मुंबई/नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी कारवाया करण्याच्या इसिसने आखलेल्या कटाचा पर्दाफाश करत एनआयएने शुक्रवारी सुरू केलेले अटकसत्र शनिवारीही सुरूच राहिले. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरच्या इम्रान मोअज्जम खान या २६ वर्षांच्या युवकाच्या अटकेने राज्यात पकडलेल्यांची संख्या ३ झाली आहे. ‘इसिस’च्या जाळ्याचे महाराष्ट्र मुख्य केंद्र असावे, असा एनआयएचा होरा आहे. शुक्रवारी ताब्यात घेतलेल्या १३ जणांना अटक करून दिल्लीला नेण्यात आले.एटीएसच्या मदतीने एनआयएने शुक्रवारी मुंब्रा येथून मुदब्बीर शेखला अटक केली होती. तो ‘इसिस’च्या चमूचा अमीर अर्थात प्रमुख होता. तर वैजापूर येथे अटक झालेला इम्रान हा सेकंड-इन-कमांड होता. इम्रान कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनीअर असून, गेल्या दोन वर्षांपासून तो अंधेरीच्या खाजगी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. तो मुंब्रा येथे राहत असे. आॅक्टोबर २०१५मध्ये त्याने वैजापूर येथे कॉम्प्युटर व लॅपटॉप दुरुस्तीचे काम सुरू केले होते. इम्रान हा दोन वर्षांपासून मुदब्बीर शेखच्या संपर्कात होता, अशी माहितीही समोर आली आहे. (विशेष प्रतिनिधी)हे अडकले जाळ्यात सय्यद मुजाहीद (३३, तुमकूर, कर्नाटक), असिफ अली उर्फ अरमान सानी (२१), सुहेल अहमद उर्फ सोहेल उर्फ हफिस साब (२३) व मोहम्मद अब्दुल अहाद उर्फ बडे अमीर उर्फ सुलेमान (४६) (तिघेही बेंगळुरू), मोहम्मद अलीम (२०, लखनौ), मोहम्मद ओबेदुल्ला खान उर्फ ओबीद उर्फ तलहा (३३) व अबू अनास (२४) (दोघेही हैदराबाद) आणि मोहम्मद हुसेन खान उर्फ जमील (३६, माझगाव, मुंबई)‘साब, मुझसे गलती हो गई!’याच कारवाईत शुक्रवारी मुंबईत माझगाव येथे अटक केलेल्या खान मोहम्मद हुसैन यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता, ‘साब, मुझसे गलती हो गई!’ अशी कबुली त्याने न्यायाधीशांपुढे दिली. त्याच्या वकिलांनी मात्र पोलिसांच्या दबावाखाली हे कथन केल्याचा आरोप केला.अनेक दिवसांपासून होती पाळतगृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू, तुमकूर, मंगलोर, हैदराबाद, मुंबई व लखनौ शहरातील १२ ठिकाणांवर शुक्रवारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ‘एनआयए’ने एकाच वेळी छापे टाकून १४ जणांना पकडले होते. त्यापैैकी १३ जणांना अटक करण्यात आली. छाप्यात स्फोट घडवून आणणारे सर्किट्स जप्त करण्यात आले. ‘एनआयए’ने सांगितले की, छाप्यादरम्यान मोबाइल फोन्स, लॅपटॉप, बेहिशेबी पैसा, जिहादी साहित्य व व्हिडीओ तसेच बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे विशिष्ट साहित्य जप्त केले. ‘एनआयए’ने सांगितले की, अटक केलेल्या सर्वांवर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात होती. प्रजासत्ताक दिनी देशभरात हल्ले करण्याच्या सूचना त्यांना मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना अटक केली. अटक केलेल्या सर्वांचा संबंधित न्यायालयांकडून प्रवासाचा रिमांड घेऊन नंतर दिल्लीत आणले जात आहे, असे ‘एनआयए’ने सांगितले.शस्त्रे मिळवून प्रशिक्षण देण्याची योजना उधळलीस्फोटके बनविण्यासाठी तसेच शस्त्रे मिळविण्यासाठी चॅनेल निर्माण करण्याची योजना आखणे, शस्त्रास्त्रे प्रशिक्षणासह इतर प्रशिक्षण देण्यासाठी ठिकाणे शोधणे, पोलीस अधिकारी व परदेशी नागरिकांवर हल्ले करण्यासाठी नवीन समर्थकांना उद्युक्त करणे, देशात दहशतवादी कारवाया करणे आदी कृत्ये हे संशयित करीत होते, असे ‘एनआयए’ने सांगितले.विविध शहरांतील काही विशिष्ट व्यक्ती दहशतवादी कृत्ये करण्यासाठी स्वत:ला तयार करण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. अटक केलेले सर्व जण ‘जानूद-उल-खलिफा-ए-हिंद’ या दहशतवादी संघटनेचा भाग आहेत. या संघटनेची विचारसरणी इसिससारखीच आहे, असे सूत्रांनी सांगितले. या गटाला हवालामार्फत पैसा मिळत होता, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली. तसेच शेखला ६ लाख रुपये मिळाले होते, असेही त्यांनी सांगितले. तपासात हे इसिससारख्या विचारसरणीच्या गटात काम करीत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना चौकशीसाठी नवी दिल्लीत आणले आहे.
‘इसिस’चे मुख्य केंद्र महाराष्ट्र ?
By admin | Published: January 24, 2016 2:49 AM