ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया (इसीस) मुंबईवर हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार इसीसचे दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत प्रवेश करत हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी 26/11 प्रमाणे हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ दहशतवादी या हल्ल्यात सामील होण्याची शक्यता असून हे सर्वजण आसामचे आहेत.
एकीकडे तटरक्षक दलाने अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं सांगितलं असताना मुंबई पोलिसांनी मात्र गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली माहिती उघड करण्यास नकार दिला आहे. नेहमीप्रमाणे अलर्ट देण्यात आल्याचं अधिकारी सांगत आहेत. क्राईम ब्रांचचे अधिकारीदेखील लॉज आणि हॉटेल्सची तपासणी करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिका-यांना रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी सुरु ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी समुद्रामार्गे प्रवेश करत लष्कर-ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात एकूण 166 लोकांनी आपला जीव गमावला होता, तर कित्येकजण जखमी झाले होते. दहापैकी नऊ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं, तर अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं होतं. त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली.