मुंबई : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्याच्या कासाबुद्रुक येथील जि.प. शाळेत इस्कॉन संस्थेने पुरविलेल्या माध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची चौकशी शिक्षण आयुक्तांमार्फत केली जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जयप्रकाश मुदंडा, वर्षा गायकवाड, दीपिका चव्हाण, मनीषा चौधरी, प्रा. मेधा कुलकर्णी यांनी या विषबाधेसंदर्भात लक्षवेधी मांडली.तावडे म्हणाले की, ‘शाळेतील मुलांना माध्यान्ह भोजन कोणत्या संस्थेकडून देण्यात यावे, याबाबतचा निर्णय शाळेची स्थानिक कार्यवाही समिती घेत असते. कासाबुद्रुक जिल्हा परिषदेच्या शाळेला माध्यान्ह भोजन इस्कॉन फूड रिलिफ फाउंडेशन या संस्थेमार्फत पुरविण्यात येत असून, इतरही अनेक शाळांना याच संस्थेमार्फत माध्यान्ह भोजन पुरविण्यात येते. असे असताना फक्त याच शाळेतील मुलांना या भोजनातून विषबाधा झाली असल्याने, या संदर्भात अधिक तपास करण्यात येईल. उष्णतेमध्ये अन्न बराच वेळ ठेवल्याने खराब झाले किंवा मग इस्कॉन फाउंडेशन यांच्यामार्फत पुरविण्यात आलेली खिचडी निकृष्ट दर्जाची होती, याबाबतची तपासणी प्रयोगशाळेमार्फत करण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)
इस्कॉनच्या माध्यान्ह भोजनाची चौकशी
By admin | Published: March 15, 2016 1:35 AM