लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इस्रायलमधील भारतीय वंशाच्या ज्यूंमध्ये महाराष्ट्रातील ज्यू सर्वाधिक आहेत. मराठी बोलणारा मोठा समूह इस्रायलमध्ये आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राशी इस्रायलचे विशेष नाते आहे. परिणामत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्या सुरू असलेल्या इस्रायल भेटीचा महाराष्ट्राला विशेष लाभ मिळेल, असे मत इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत डेव्हिड अकोव्ह यांनी व्यक्त केला. येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या दौऱ्यामुळे शेती, सिंचन, संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रात उभय देशांतील संबंध अधिक दृढ होतील, असे विश्वासही त्यांनी व्यक्त केला.इस्रायलच्या कृषी तंत्रज्ञांकडून राज्यात पुणे, नागपूर, इंदापूर, औरंगाबाद येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच ‘माशोव’ या सहकारी पद्धतीचे ग्रामजीवन आणि शेतीचे प्रयोगाही तेथे राबविण्याचा विचार सुरू आहे. २०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्रायलला भेट दिल्यानंतर यवतमाळ येथे ‘माशोव’ आधारित प्रकल्प सुरू झाला, अशी माहिती अकोव्ह यांनी या वेळी दिली. तसेच सध्या हरयाणामध्ये इस्रायलप्रमाणे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नवे दुग्धविकास केंद्र स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.५ अब्ज डॉलर्सचा विशेष निधीइस्रायली जलसंवर्धन मॉडेल कॅलिफोर्निया, आॅस्ट्रेलियामधील कोरड्या प्रदेशांसाठी वापरले जाऊ शकते. हेच मॉडेल मराठवाड्यासह भारतातील विविध दुष्काळी भागांत वापरले जाऊ शकेल, असे अकोव्ह यांनी सांगितले. इस्रायलने सध्या भारतातील शेती, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये संबंध वाढीस लागावेत यासाठी ५ अब्ज डॉलर्सचा विशेष निधी उभारला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
इस्रायल दौऱ्याचा राज्याला लाभ!
By admin | Published: July 05, 2017 5:14 AM