मुंबई : राज्याला दुष्काळाचे तीव्र चटके सहन करावे लागत असून, राज्य कायमस्वरूपी दुष्काळमुक्त व्हावे यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र याबाबतीत राज्यातील शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्त व्हावा याकरिता त्याला आधुनिक कृषी तंत्रज्ञान व इतर तंत्रज्ञान देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारच्या प्रयत्नांना इस्रायलने साथ द्यावी आणि भरघोस पीकवाढीचे व कमी पाण्यावर यशस्वी शेती करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा राज्यमंत्री (अर्थ) दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.इस्रायलाच्या ६८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सेंट रिजिस येथे आयोजित सोहळ्यात दीपक केसरकर बोलत होते. या वेळी इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्य दूत डेव्हिड अकोव, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दीपक केसरकर यावेळी म्हणाले, भारत-इस्रायल सहकार्यांतर्गत राज्यात फलोत्पादन क्षेत्रात चार ठिकाणी कृषी गुणवत्ता केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्यांचा फायदा हजारो शेतकरी घेत आहेत. भविष्यात भाजीपाला तसेच केळी इत्यादी क्षेत्रांत गुणवत्ता केंद्र सुरू करण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने इस्रायलला केली आहे. तर डेव्हिड अकोव यांनी आपल्या भाषणात भारत-इस्रायल संबंधांतील मुख्यंत्र्यांचा इस्रायल दौरा, इस्रायली कृषी मंत्र्यांचा भारत दौरा, महाराष्ट्र शासनाचा शिष्टमंडळांचा कृषी, पाणी, सायबर सुरक्षा तसेच स्मार्ट शहर इत्यादी विषयांचा अभ्यासदौरा आणि भारतीय कंपन्यांची इस्रायली स्टार्ट-अप इकोसिस्टिममध्ये गुंतवणूक अशा विविध घडामोडींचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)
कृषी तंत्रज्ञानासाठी इस्रायलने मदत करावी
By admin | Published: May 14, 2016 2:49 AM