पुणे : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान २ या महत्वाकांक्षी मोहिमेला मुहूर्त मिळाला आहे. या मोहिमेतील यानाचे एप्रिल अखेरीस उड्डाण होईल. याबाबतची तयारी सुरू असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित अवकाश विज्ञानाशी संबंधित परिषदेदरम्यान सिवन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे ही मोहिम सातत्याने पुढे ढकलली जात आहे. चंद्राच्या दक्षिण धु्रवाकडील प्रदेशात हे यान उतरविण्याचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान १ मोहिमेमध्ये चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा शोध लागला होता. चांद्रयान २ मोहिमे अंतर्गत त्याचा अधिक खोलवर अभ्यास केला जाणार आहे. सिवन म्हणाले, या मोहिमेसाठीची आवश्यक चाचण्या सध्या सुरू आहेत. एप्रिल अखेरीस आम्ही यान सोडण्यासाठी सज्ज असू. चांद्रयान २ यानाचे वजन जवळपास ३ हजार २९० किलो आहे. यासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक अनिल भारद्वाज यांनी परिषदेमध्ये चांद्रयान २ बाबत सादरीकरण केले. ते म्हणाले, चांद्रयान २ मध्ये ‘लँडर’चा समावेश असेल. त्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर यान व्यवस्थितपणे उतरू शकेल. तसेच ‘रोव्हर’ला उतरविले जाईल. रोव्हरच्या माध्यमातून पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. मुख्य यान (ऑर्बिटर) चंद्राभोवती फिरून पृष्टभागाचा ‘थ्री डी’ नकाशा तयार करेल. हा भौगोलिक अभ्यास करण्याबरोबरच चांद्रयान २ मध्ये काही नवीन तंत्रज्ञानाचीही चाचणी घेतली जाणार आहे. त्याचा भविष्यातील मोहिमांसाठी फायदा होईल. -----------------
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) ‘चांद्रयान-२’ मोहिमेला एप्रिल अखेरचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 7:39 PM
चांद्रयान २ यानाचे वजन जवळपास ३ हजार २९० किलो आहे. यासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
ठळक मुद्देचांद्रयान १ मोहिमेमध्ये चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा शोध