नवी दिल्ली : येत्या २१ तारखेपासून सुरूहोणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. संसदेत सामान्यत: राज्यांचे विषय उचलण्याची परंपरा नाही. मात्र, ही परंपरा बाजूला सारून भाजपशासित मुख्यमंत्र्यांशी संबंधित वाद उचलून धरत, सरकारची चहूबाजूंनी कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. यामुळे आगामी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपशासित मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्याशी संबंधित कथित घोटाळे आणि वाद उचलून धरण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकारला घेरण्याचे डावपेच विरोधकांनी आखले आहेत. मुख्यमंत्र्यांशी संबंधित मुद्यांवर धारण केलेल्या ‘चुप्पी’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचेही विरोधकांचे मनसुबे आहेत. शिवराजसिंह व्यापमं घोटाळ्यात अडकले आहेत, तर वसुंधरा राजे या ललित मोदी विवादामुळे गोत्यात आल्या आहेत. तिकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री पीडीएस घोटाळ्यांमुळे वांध्यात सापडले आहेत. विरोधकांनी या तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. भाजपकडून मात्र यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारच्या कारवाईचे संकेत मिळालेले नाही. याव्यतिरिक्त आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्याच्या आरोपांमुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज गोत्यात आल्या असून सरकारला टीकेचा सामना करावा लागू शकतो.
मुख्यमंत्र्यांचा वाद संसदेत गाजणार
By admin | Published: July 13, 2015 12:50 AM