मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. परंतु भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
कर्जमाफीच्या निर्णयावर बोलताना खडसे म्हणाले की, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे उचित नसल्याचे खडसे म्हणाले. मात्र त्याचवेळी खडसेंनी या निर्णयाचं स्वागतही केलं आहे.
या कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे समाधान होणार नसलं तरीही दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे भाजप नेते सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत टीका करत असताना खडसे यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
तसेच याचवेळी बोलताना त्यांनी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट केलं. तसेच भाजपने पाच दिवसात निर्णय घ्यावा अशी कोणतेही मागणी मी पक्षाला केली नाही. मी स्वता: पक्ष चालवलेला आहे त्यामुळे पाच दिवसात कोणताही पक्ष निर्णय घेऊ शकत नाही. असेही खडसे म्हणाले.