पुणे: मद्याविक्री आधीच सुरू केली, आता हॉटेल्स आणि बारही सुरु केले, लग्नकार्यातील उपस्थितीवरच निर्बंध कशासाठी? हा सवाल विचारला आहे लग्नातील पंगतीवर व्यवसाय अवलंबून असणाऱ्या केटरिंग चालकांनी! तोही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच!
महाराष्ट्र केटरिंग असोसिएशने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवून सरकारी निर्णयातील विसंगतीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. मिशन बिगीन अंतर्गत अनेक गोष्टी सुरू झाल्या, मात्र लग्नकार्यातील ५० जणांच्या उपस्थितीवरचे निर्बंध आहे तसेच आहेत. त्याचा थेट परिणाम केटरिंग चालकांवर झाला आहे. जेवणावळीच होत नसल्याने त्यांच्या हाताला पुरेसे कामच राहिलेले नाही. मार्च ते जूलै २०२० या काळात फक्त लग्नाचे ६० मुहूर्त होते, त्याशिवाय अन्य कार्यक्रम. या सगळ्यातील परिस्थिती केवळ ५० होती. त्यामुळे एरवी चांगला रोजगार निर्माण करणारा हा व्यवसाय मोडून पडला असल्याची तक्रार असोसिएशनने केली आहे.या एका निर्बंधामुळे फक्त केटरिंगच नाही तर मंगलकार्यालयांपासून ते भटजी, फोटोग्राफर्स, व्हिडीओ चित्रीकरण करणारे, वाढपी, लहान मुलांची खेळणी तयार करणारे असे एकूण ५० व्यवसाय व त्यावर अवलंबून असणाऱ्या आठ लाखांपेक्षा अधिक लोकांचा तब्बल सहा महिने रोजगार बुडाला. त्यातील अनेक व्यावसायिकांनी सिझन लक्षात घेऊन कर्ज काढले होते, ते फेडता येत नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. ते संघटीत नसल्याने सरकारकडून त्यांना एका पैशाचीही मदत होत नाही असे असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितले.एसटी बसला पुर्ण क्षमतेने, हॉटेल, बारला ५० टक्के ऊपस्थितीने परवानगी दिली, मग लग्नकार्यांनीच सरकारचे काय घोडे मारले आहे असे सरपोतदार म्हणाले. कोरोना संकट सर्वांवरच आले आहे, मात्र त्यातून मार्ग काढला जात आहे, तसाच मार्ग लग्नकार्यातील ऊपस्थितीची अट ५० ऐवजी किमान २०० करून काढावा अशी मागणी असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.