जमीर काझीमुंबई : राज्य पोलीस दलामध्ये २०११नंतर भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या आंतर जिल्हा बदलीबाबतच्या विनंती अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी नुकतेच राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून बदलीसाठी इच्छुक हजारो पोलिसांची इच्छापूर्ती लवकर होण्याची शक्यता आहे. घटक बदलीसाठी निर्धारित केलेल्या निकषांच्या आधारावर त्यांच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घेण्याचे निर्देशही माथुर यांनी घटकप्रमुखांना दिले आहेत. या प्रलंबित प्रस्तावाचा ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.पोलीस दलात २०११ नंतर भरती झालेल्या उमेदवारांना तीन आवश्यक बाबींच्या निकषावर आंतर जिल्हा बदली करण्याच्या प्रस्तावाला गृहविभागाने १९ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्याबाबतचा प्रस्ताव महासंचालकांनी विभागाकडे वर्षभरापूर्वी पाठविला होता. आता मंत्रालयातून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर, माथुर यांनी त्याबाबतचा निर्णय घटकप्रमुखांनी घेण्यास सांगितले आहे.२०११ नंतर ज्या पोलीस घटकात उमेदवाराची नियुक्ती झाली आहे, तेथून कोणत्याही परिस्थितीत अन्य घटकामध्ये आंतरजिल्हा बदली करावयाची नाही, असा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, काहींची बदली मूळ गावापासून दूर झाल्याने, त्यांना वृद्ध आईवडिलांना गावी एकटेच ठेवून यावे लागले आहे, तर पुरुष किंवा महिला पोलिसांचे जोडीदार अन्य जिल्ह्यांमध्ये नोकरीला आहेत. त्यांना स्वतंत्र राहावे लागते. या सर्व घरगुती समस्यांचा परिणाम पोलिसांच्या कामावर होऊ लागला आहे. त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागल्याने, पोलीस महासंचालकांनी ही अट रद्द करून, त्यांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी गृहित धरले जावे, असा प्रस्ताव २८ आॅक्टोबरला गृहविभागाकडे पाठविला होता.निर्णय महासंचालकांकडे२०११ नंतर सुमारे २० हजार पोलिसांची भरती झाली आहे. गृहविभागाच्या मंजुरीमुळे त्यांच्या नियुक्तीतील नियम ३(२),(अ) उपखंड(अ)च्या अधीन राहून, इतर पोलीस घटकांमध्ये बदलीसाठी पात्र ठरले आहेत. त्यासाठीची पात्रता, त्याची प्रक्रिया, सक्षम प्राधिकारी, सेवा ज्येष्ठता आदी निकषांवर त्यांची बदली कुठे करायची, याचा निर्णय महासंचालक घेतील.अशी होणार प्रक्रियाइच्छुक पोलिसांनी मूळ घटकप्रमुखांकडे आवश्यक अटींची पूर्तता व कागदपत्रांच्या प्रतींसह अर्ज केल्यानंतर, त्याची एक प्रत ज्या घटकामध्ये बदलून जायचे आहे, तेथील घटकप्रमुखाकडे माहितीसाठी पाठवायची आहे. पोलीस आयुक्त/अधीक्षक हा अर्ज आस्थापन मंडळासमोर ठेवतील.आवश्यक छाननीनंतर एका महिन्याच्या आत निर्णय घेतला जाईल. पात्र अर्ज पोलीस इच्छुक असलेल्या संबंधित घटकप्रमुखाकडे पाठवतील. त्यांनी त्याबाबत एका महिन्याच्या आत संमतीपत्र पाठवायचे आहे. त्याचप्रमाणे, ज्या पोलिसांचे अर्ज अमान्य करण्यात आले आहेत, त्यामागील कारणासह संबंधित पोलिसाला माहिती द्यायची आहे.यांना मिळणार प्राधान्य? आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्यांची मूळ घटकात किमान तीन वर्षे सेवा झाली पाहिजे. त्याचबरोबर, पोलीस दाम्पत्य एकत्रीकरण, तसेच स्वत: कॉन्स्टेबल किंवा त्याचे जवळचे नातेवाईक गंभीर आजारी असणे, या निकषांवर त्यांच्या अर्जावर निर्णय घेतला जाईल.
‘त्या’ पोलिसांची आंतरजिल्हा बदली करणे शक्य होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 4:04 AM