Ajit Pawar: अनिल देशमुखांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत; १००० कोटींची संपत्ती जप्त करण्याचे IT विभागाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:21 AM2021-11-02T09:21:23+5:302021-11-02T09:24:29+5:30
Income Tax Action Against DCM Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर आणखी एक दणका पक्षाला मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली आहे.
मुंबई – महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा धडाका लावला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या अटकेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
मागील काही दिवसांपासून अजित पवार(Ajit Pawar) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार केली होती. बेनामी पद्धतीने संपत्ती गोळा करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. मोहन पवार हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली होती. आजतकनं याबाबत वृत्त दिलं आहे.
अजित पवार (स्वत:), त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार, मुलगा पार्थ अजित पवार, आई आशा अनंतराव पवार, बहीण विजया मोहन पाटील, जावई मोहन पाटील, बहीण नीता पाटील यांच्या बँक खात्यात ही बेनामी आवक आल्याचे व्यवहार आढळून आले आहेत. तसेच गेले १९ दिवस आयकर(Income Tax) आणि आता ईडीचे धाडसत्र आणि शोध ऑपरेशन(सर्च) सुरु आहे. १ हजार ५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे, त्याचबरोबर १८४ कोटी रुपयांची रोकड, दागिने (ज्वेलरी), आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र इ. इन्कम टॅक्सच्या हाती लागले असल्याचे ट्विटद्वारे माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती. त्यानंतर आता आयकर विभागाने ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्यानं अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
खालील संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश
जरंडेश्वर साखर कारखाना – अंदाजित किंमत ६०० कोटी
दक्षिण दिल्लीतील फ्लॅट – २० कोटी
पार्थ पवार निर्मल ऑफिस – २५ कोटी
निलय नावाचं गोव्यातील रिसोर्ट – २५० कोटी
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या जमिनी – जवळपास ५०० कोटी
१३ तासांच्या चौकशीनंतर अखेर अनिल देशमुखांनाED कडून अटक
गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात होते.