बारामती : राज्यात सत्तास्थापनेबाबत काँग्रेसने शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेने आम्हाला प्रस्ताव दिल्यास दिल्लीशी चर्चा करून निर्णय घेऊ. मात्र जनतेने आम्हाला विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचा कौल दिला असल्याने वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली.
थोरात यांनी शनिवारी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली. पवारांसोबत झालेल्या चर्चेमुळे राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगली होती. या दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, राज्यातील जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलेला आहे. त्यामुळे वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही. विरोधी पक्षनेतेपदाच्या संदर्भातही काही चर्चा झालेली नाही. दिवाळीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र बसून सर्वच विषयांवर निर्णय घेतील. काँग्रेस- राष्ट्रवादीने सध्या नेमकी काय भूमिका घेतली, त्यांच्या अपेक्षा काय आहेत याबाबत विचारल्यावर त्यांनी ही भेट दिवाळीनिमित्त असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे व नवनिर्वाचित आमदार रोहित पवार उपस्थित होते.
शरद पवार यांच्या भेटीसाठी संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात येण्याची चर्चा दिवसभर होती. दुपारी केवळ थोरात यांनी पवारांची भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे, रोहित पवार उपस्थित होते. अजित पवार बैठकीला उपस्थित नव्हते.तिसरा पर्याय निर्माण करण्याचा प्रश्नच नाही - पवारशरद पवार म्हणाले, पुढील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करतील. सत्ता स्थापन करणे किंवा तिसरा पर्याय निर्माण करण्याचा प्रश्नच नाही. विरोधी पक्षात बसण्याचा कौल आम्ही स्वीकारला आहे. ३० तारखेला दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलावली आहे.श्रीनिवास पाटील यांचा बारामतीमध्ये सत्कार‘माझे सवंगडी आणि आता सातारा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी मैत्रीपुढे कशाची फिकीर केली नाही. स्वत:ला लोकसभेच्या आखाड्यात झोकून दिले. त्यामुळे त्यांचा सत्कार करताना मनस्वी आनंद होत आहे,’ अशा भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्यावतीने शुक्रवारी शरद पवार यांच्या हस्ते श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सारंग पाटील आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, साताऱ्याच्या जनतेने जो विश्वास दाखविला आहे. त्याबाबत त्यांचे साताºयात जाऊन आभार मानणार आहे. श्रीनिवास पाटील यांचा देखील साताºयात सत्कार करण्याचे नियोजन केले होते. पण, तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे श्रीनिवास पाटील स्वत:च बारामतीमध्ये आले आणि हा सोहळा पार पडला.