- अजय परचुरे
नागपूर : माझ्याजवळ नक्षलवादी विचारांचं पत्रक सापडलं तर मला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल का? या प्रेमानंद गज्वींच्या कलाकारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. देशात मुळातच भयग्रस्त वातावरण नाही. नाट्य संमेलनातील अध्यक्षीय पदावरून गज्वींनी स्वत:ला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल, असा प्रश्न विचारणं म्हणजे ही अतिशयोक्ती आहे, अशी टीका लेखक व नाटककार अभिराम भडकमकर यांनी केली.
लेखकांना लिहिण्याचं आज तरी स्वातंत्र्य आहे. लेखकाची सरसकट धरपकड होतेय, असं चित्र अजूनतरी मला दिसलेलं नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून गज्वींनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.
मला प्रेमानंद गज्वी यांचं संपूर्ण भाषण आवडलं. शहरी नक्षलवादाबद्दल त्यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि लेखक म्हणून त्यांना आलेले अनुभव आणि त्यामुळे त्यांनी मांडलेले विचार मांडण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे, असे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी म्हणाले.
पण ते म्हणतात तसा अनुभवन कलाकार म्हणून मला अजून कधी आलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत लिमये म्हणाले की, गज्वींचे विचार नाकारण्यासारखे नाहीत. त्यांनी आतापर्यंत केलेलं प्रामुख्याने संशोधनात्मक आहे. त्यांनी करमणुकीचं लिखाण केलंलं नाही. त्यांचा विचार एका प्रकारे विद्रोही आहे.
असं वातावरण घाशीराम कोतवाल, सखाराम बार्इंडर नाटकांच्या वेळीही होतं. लेखकाला नेमकं काय म्हणायचंय, त्याला नेमकं काय मांडायचं आहे हे न समजता विरोध यापूर्वीही झाला. गज्वींनी अनुभवातून हा विचार मांडला का? हे तपासण्याची गरज आहे.नाटककार शफाअत खान म्हणाले की, प्रश्न विचारायचा नाही, वाटलं तरी लिहायचं नाही याचं स्वातंत्र्य हिरावलं गेलं आहे वा तसा दबाव वरूनच आलाय असं नव्हे. सध्या रस्त्यावरील माणसालाही काही पटले नाही तर कायदा हातात घेतला जातो. ही परिस्थिती आधी नव्हती. ती आपली संस्कृती नव्हती. समाज गोठलेल्या मन:स्थितीत आहे. जोपर्यंत विचारांचं, लिखाणाचं, वागण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत समाजाचं हे गोठलेपण काही केल्या कमी होणार नाही.संमेलनाध्यक्षांची वारीप्रेमानंद गज्वींसह आतापर्यंतच्या ९९ नाट्य संमेलनाध्यक्षांचा आढावा घेणारा कार्यक्रम रविवारी होणार आहे. यात नागपुरातील २०० कलाकार सहभागी होणार आहेत.
कुछ भी ‘सही’ नहींनागपूरच्या नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाला आलेल्या कलाकारांची फरफट केली. याचा मोठा फटका बसला मराठी सुपरस्टार भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ नाटकाच्या कलाकारांना. नागपुरात आल्यावर या कलाकारांना ३ तास हॉटेल मिळण्यासाठी वणवण करावी लागली. एवढेच नव्हे, तर सुरेश भट नाट्यगृहात आल्यावर त्यांना चहा व नाश्ताही मिळाला नाही. त्यामुळे भरत जाधव व सारेच कलाकार चिडले होते.