योगेश पांडे
नागपूर : आसाममध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे. लोकसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांत संघ स्वयंसेवकांनी सक्रिय प्रचार केला नसला तरी विजयाचा खरा पाया त्यांनीच रचला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघाचे कार्य वाढीस लागले असून तळागाळापर्यंत तेथील स्वयंसेवक व प्रचारक पोहोचत आहेत. खडतर परिस्थितीत संघ प्रचारकांनी दुर्गम क्षेत्रात केलेल्या कार्याची पावती भाजपाला या विजयाच्या रूपात मिळाली. आसाममध्ये संघाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अगदी स्वातंत्र्यानंतरच संघाने पूर्वोत्तर राज्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. या भागात वाढणारे धर्मांतरण, सीमेवरून होणारी घुसखोरी, शिक्षणाचा अभाव इत्यादी मुद्यांवर संघाने वेळोवेळी चिंता व्यक्त केली व यासंदर्भात विविध उपक्रमदेखील राबविले. या मुद्यांवर संघ प्रचारकांनी अगदी दुर्गम भागात जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. या कामात अडचणी येत असल्याने येथे सत्ता यावी, अशी संघ धुरिणांची इच्छा होती.
त्यामुळेच येथील शाखाविस्तारावरदेखील भर देण्यात आला होता. शिक्षणावर दिला भर विद्यार्थी व तरुणांच्या समस्यांवरदेखील संघ पदाधिकारी सातत्याने काम करत होते. दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी एकल विद्यालयांचा प्रयोग राबविण्यात आला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये ३०० हून अधिक एकल विद्यालय चालत आहेत. याशिवाय हिंसाग्रस्त भागातील अनेक विद्यार्थी देशाच्या विविध भागात संघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी पूर्वोत्तर राज्यांतील विद्यार्थ्यांवर देशात निरनिराळ्या ठिकाणी हल्ले झाले होते. त्यावेळी संघाने त्यांना मदतीचा हात दिला होता. नागरिकांमध्ये जागविला संघाबाबत विश्वास नागरिकांमध्ये जागविला संघाबाबत विश्वास गेल्या काही कालावधीत आसाममधील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर संघ प्रचारकांनी भर दिला होता. दोन वर्षेंअगोदर आसाममध्ये भडकलेली जातीय हिंसा असो किंवा नैसर्गिक आपत्ती, प्रत्येकवेळी संघ स्वयंसेवक स्थानिक नागरिकांसोबत उभे राहिले व मदतीचा हात दिला.
सेवा भारती तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आसाममध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आदिवासी, दुर्लक्षित नागरिकांसाठी विविध योजनादेखील सुरू आहेत. सीमाभागातदेखील संघाने कामावर भर दिला व सुनील देशपांडे यांनी तर आसाम अक्षरश: पिंजून काढले. भाजपाच्या प्रचाराची जबाबदारीदेखील संघाचे माजी प्रवक्ते राम माधव यांच्याकडेच देण्यात आली. याचाच फायदा विधानसभा निवडणुकांमध्ये झाला अन् भाजपाला ऐतिहासिक यश मिळाले. राष्ट्रीय शक्तींना जनतेचे समर्थन आसाममधील या ऐतिहासिक विजयाबद्दल संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय विचारसरणीच्या शक्तींना जनतेने दिलेले हे समर्थन आहे. संघाचे या भागात फार अगोदरपासून विधायक कार्य सुरू आहे. कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून काम करण्यात येत नाही. विचार असतो तो फक्त देशाचा. अतिशय विपरीत परिस्थितीत येथे कामाला सुरुवात केली होती. या विजयामुळे येथील नागरिकांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला आहे. -डॉ. मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचार प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ