पुणे : रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दिवसेंदिवस या प्रकरणावरून एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडतच चालल्या आहेत. त्याचवेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षितता व तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावरून गृहमंत्री आणि देशमुख यांनी राज्यपालांना गोस्वामीबाबत कोणतीही चिंता करू नका असे सांगत त्यांच्या सुरक्षिततेविषयी आश्वस्त केले होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांना याच मुद्दयाला अनुसरून जोरदार टोला लगावला आहे.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी शरद पवार हे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, राज्यपालांनी गृहमंत्र्यांना फोन करून अर्णव गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली ते चांगले आहे. पण मला वाटते त्यांनी ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली असते तर ते अधिक चांगले झाले असते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावला आहे. अन्वय नाईक कुटुंबियांसोबतचा सोशल मीडियावरचा माझा फोटो ५ वर्षांपूर्वीचा आहे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पवार म्हणाले,बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. तेजस्वीला फ्री हँड द्यायचा होता. यातूनच देशातील यंगस्टार्सना प्रेरणा मिळणार आहे. तसेच सुरु असलेल्या बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाच्या जास्त जागा दिसत असले तरी पण नितीशकुमार यांचे मोठे नुकसान होईल असे जे वाटले होते तसे काही घडले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे अशा शब्दात पवारांनी यावेळी फडणवीसांना देखील चिमटा काढला.
पुढे पवार यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल घेतलेली भेट ही फक्त मी रयतची देणगी रक्कम देण्यासाठी होती. त्यात विधानपरिषद राजकारणावर कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. अमेरिकेचा निकाल स्वच्छ आहे. तरीही ट्रम्प मीच विजयी झालो असे म्हणत असतील तर ते त्यांच्या वयाला साजेसे नाही.