ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांविरोधात जोरदार तोफा धडाडल्या. पण राजकारणात जे घडते ते प्रवाही असते, झाले ते झाले अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मांडली आहे. पण वर्षभरातच जनतेचा मूड का बदलला याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा सोमवारी निकाल लागला. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेने बाजी मारली असली तरी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला भाजपा किंवा अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर कोल्हापूरमध्ये भाजपा ताराराणी आघाडी शिवसेना व अन्य पक्षांच्या मदतीेने सत्ता स्थापन करु शकते. निवडणुकीत शिवसेना - भाजपामधील वाकयुद्ध रंगले असले तरी निकालांनंतर शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसते. मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी झाले ते झाले असे सूचक विधान केले आहे. निवडणुकीत एकमेकांच्या कोसाट्यास हात घालण्याचा प्रयत्न झाला पण शिवसेनेचा कासोटा घट्टा असल्याने तो तसाच राहिला असेही त्यांनी नमूद केले. स्मार्ट सिडी आणि साडे सहा हजार कोटींच्या पॅकेजला न भूलता कल्याण डोंबिवलीकरांनी शिवसेनेला साथ दिली यासाठी त्यांचे ऋणी आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.