sameer wankhede chat news | मुंबई : दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयच्या समन्सवर दिलासा देण्यास नकार दिल्याने एनसीबीचे तत्कालीन संचालक समीर वानखेडें यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अशातच वानखेडे यांच्या याचिकेत एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेसोबत जोडली आहे. तसेच 'माझ्या माझ्या मुलाची काळजी घे' असे शाहरूखने तत्कालीन अधिकारी वानखेडे यांना सांगितले आहे.
दरम्यान, समीर वानखेडे यांनी याचिकेत शाहरूख खानसोबतचे ३ आणि ४ ऑक्टोबरचे मेसेज उघड केले आहेत. शाहरूखने आपल्याला पाठवलेले मेसेज वानखेडे यांनी मांडले असून शाहरूखनेच आपल्याशी प्रथम संपर्क साधल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे. तसेच शाहरूखने त्यांच्या कार्याचे कौतुक केले असल्याचे पुरावे वानखेडे यांनी कोर्टात सादर केले आहेत, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे.
वानखेडे यांचा मोठा खुलासासमीर वानखेडे यांनी कोर्टात केलेल्या याचिकेत शाहरूखसोबतच्या संभाषणाचा खुलासा केला आहे. याचिकेत नमूद असलेल्या चॅटनुसार शाहरूखने वानखेडे यांना म्हटले, "तुम्ही मला वचन दिले होते की, त्याला सोडून देऊ आणि अशा पद्धतीचे काहीही करणार नाही, ज्याने त्याला त्रास होईल. आर्यनला तुरूंगात टाकू नका, तो एक चांगला माणूस बनेल यापद्धतीने त्याच्याशी व्यवहार करा. तो तुरूंगात गेल्यास पूर्णपणे तुटेल. तुम्ही म्हणाल ते मी करेन पण माझ्या मुलासोबत असा व्यवहार करू नका. नवाब मलिक जे काही बोलत आहेत त्याबद्दलही मी मध्यस्थी करेन आणि त्यांना असे न बोलण्यास सांगेन. कायद्याला धरून मी तुमच्याकडे भीकच मागू शकतो." यावर शाहरूखला रिप्लाय देताना वानखेडे यांनी सातत्याने कायद्याचा दाखला दिला आहे.