ठाणे : मुंबईकडे जाणाऱ्या कापूरबावडी उड्डाणपुलाच्या ८०० मीटर लेनचा शुभारंभ सोमवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला असला तरी २४ तास उलटूनही ती वाहतुकीसाठी खुलीच झाली नसल्याची बाब समोर आली आहे. केवळ येथे उभारलेल्या स्टेजच्या अडथळ्यामुळे यास विलंब झाल्याचे मत एमएसआरडीसीने व्यक्त केले असून, बुधवारी सकाळी ती खुली होईल असे स्पष्ट केले आहे. परंतु दुसरीकडे नॉइस बॅरिअर बसविण्याच्या कामाला सहा महिने लागणार असल्याने येथील रहिवाशांच्या कानठळ्या बसणार आहेत.तीन वर्षांनी मुंबईकडे जाणाऱ्या शेवटच्या लेनच्या तीन वर्षे शुभारंभाराच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शुभारंभ झाला असला तरीही दुसरा दिवस उजाडला तरीही हा पूल वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. उड्डाणपुलाच्या शुभारंभासाठी या पुलावर एक भव्य असा स्टेज उभारला होता. तो दुसऱ्या दिवसापर्यंत काढलेला नाही. त्यामुळेच ही वाहतूक सुरू झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मंगळवारी सकाळी ही लेन खुली केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशीही ही लेन बंद राहिली. लेनच्या उद्घाटनासाठी मोठा मंडपही उभारला होता. मात्र तोच वाहनचालकांचा खरा अडथळा ठरला. सकाळची माजिवडा आणि कापूरबावडीची वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबईकडे जाणारी लेन चांगला पर्याय असल्याने अनेक वाहनचालक या लेनवर चढले खरे, मात्र लेन बंद असल्याचे समजताच खालच्या वाहतूककोंडीपेक्षा त्यांना दुप्पट मनस्ताप सहन करावा लागला. तो रात्रीपर्यंत हटविण्यात येऊन बुधवारी सकाळी ही लेन वाहतुकीसाठी खुली होईल, अशी माहिती एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. लेन बंद असल्याचा साधा फलकही या मार्गावर लावला नसल्याने अनेक वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे या लेनवर उभारण्यात येणाऱ्या नॉइस बॅरिअरच्या निविदा अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात या कामाच्या वर्क आॅडर दिल्या जाणार आहेत. त्यानंतर सहा महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याने रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
‘ती’ मार्गिका सुरू झालीच नाही
By admin | Published: August 19, 2015 1:20 AM