मुंबई : देशाच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे आणि गुंतवणुकीसाठी उद्योजकांची पहिली पसंतीही राज्यालाच असते, असे विधान करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उशिरा का होईना महाराष्ट्राचे मोठेपण मान्य केले. त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दांत काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात राज्याचा वाटा सर्वाधिक आहे़ त्यामुळे उद्योजकांची पहिली पसंती महाराष्ट्राला असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केले. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, की मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपा नेत्यांनी महाराष्ट्राला कमी लेखण्याची सुपारीच घेतली होती. भाजपाचे केंद्रातीलच नव्हे, तर राज्यातील नेतेही महाराष्ट्रापेक्षा गुजरातच आघाडीवर असल्याची भाषा करीत पोकळ घोषणाबाजी करीत होते. सत्तेवर आल्यावर आता हेच नेते महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य असल्याचे सांगू लागले आहेत. पण उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र पहिला असल्याचा दृष्टांत झाला आहे. आता तरी त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखू नये, असा टोला सावंत यांनी लगावला.निवडणूक प्रचारात ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी भाजपाची जाहिरात दिशाभूल करणारी होती, हे आता मुख्यमंत्र्यांच्याच विधानातून स्पष्ट झाले आहे. भारतात येणाऱ्या गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याची कामगिरी काँग्रेस सरकारने बजावली. त्यामुळेच उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दिली. ही वस्तुस्थिती फडणवीसांनी मान्य केली, याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत, अशी कोपरखळी सावंत यांनी मारली.
मुख्यमंत्र्यांचे आभारच मानायला हवे
By admin | Published: January 29, 2015 5:52 AM