नाशिक : अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवस्मारकासंबंधी परवानग्या नाहीत, ‘फिजिबिलीटी रिपोर्ट्स’ नाहीत. समुद्रात भराव टाकला जाणार आहे. परंतु, नुसत्या भरावावर शिवस्मारक साकारणे अशक्य असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. शिवस्मारकासंबंधी केलेल्या भूमिपूजनाचा सोहळा म्हणजे केवळ शोबाजी, भपका असल्याची टीकाही राज यांनी केली.नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रस्तावित शिवस्मारकाबद्दल राज म्हणाले, शिवस्मारकाचा फिजिबिलीटी रिपोर्ट सरकारकडे आहे काय? शिवस्मारकाचे जे संकल्पचित्र दाखविले जात आहे, त्याचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. नुसता भपका आहे. मुळात, असे प्रकल्प साकारण्यासाठी इच्छाशक्ती लागते; ती त्यांच्याकडे अजिबातच नाही, अशी टीका करत, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे पुढे काय झाले? देशभर लोखंड गोळा केले, ते कुठे गेले? कारण त्यांना मनापासून त्या गोष्टी करायच्याच नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.जगात समुद्रात भराव घालून तयार करण्यात आलेले हाँगकॉँगचे एअरपोर्ट हे एकमेव आहे. मुळात ते आयलँड आहे. ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’चाही पुतळा समुद्रात नाही तर खाडीवर आहे. अरबी समुद्रात खाडी नाही तेथे भरावावर कसे स्मारक उभे राहू शकते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक होणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2017 4:04 AM