लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनशी (ईव्हीएम) छेडछाड करणे अशक्य आहे, असा अहवाल हैदराबाद फॉरेन्सिक लॅबने (एफएसएल) उच्च न्यायालयात मंगळवारी सादर केला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या पर्वती मतदारसंघातील बुथवरील ईव्हीएमशी छेडछाड करण्यात आली नाही, असेही हैदराबाद एफएसएलने उच्च न्यायालयाला सांगितले.पर्वती मतदारसंघातून उभे राहिलेले काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. मृदुला भाटकर यांच्यापुढे या याचिकेवर सुनावणी झाली.छाजेड यांनी केलेल्या याचिकेनुसार, १८५ व २४२ हे दोन्ही बूथ मिळून ८९ मतदारांनी त्यांनाच मत दिल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले आहे. मात्र हे दोन्ही बूथ मिळून त्यांना अवघी ६९ मते मिळाली आहेत. त्यामुळे ईव्हीएममध्ये घोळ असावा आणि त्यासाठी त्या मशीन तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवाव्यात, अशी विनंती त्यांनी याचिकेत केली आहे.मशिनशी छेडछाड करण्याचा कोणताच पुरावा नाही. तसेच त्यामध्ये असलेल्या माहितीशीही छेडछाड केल्याचा पुरावा नाही. मशिनची तपासणी न्यायवैद्यक पद्धतीने करण्यात आली आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही. मशिन एकदाच प्रोग्रॅम स्वीकारतात. त्यावर संगणकाद्वारे नियंत्रण ठेवता येत नाही. या मशिन नेटवर्कद्वारे जोडल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांची छेडछाड करणे अशक्य आहे, असे हैदराबाद एफएसएलने अहवालात म्हटले आहे.
‘ईव्हीएम’शी छेडछाड करणे अशक्य
By admin | Published: July 05, 2017 5:04 AM