भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडी करणे अपरिहार्य : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 03:20 AM2018-12-10T03:20:50+5:302018-12-10T06:51:52+5:30
प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊनच जागावाटप होईल. परंतु, समविचारी पक्षांनी एकत्र यायलाच हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
हडपसर : भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग अपरिहार्य आहे. मात्र, त्या-त्या प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊनच जागावाटप होईल. परंतु, समविचारी पक्षांनी एकत्र यायलाच हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकदिवसीय चिंतन शिबिर हडपसर येथे पार पडले. यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, दत्तात्रय भरणे, अशोक पवार, जगनाथ शेवाळे, रमेश थोरात, पोपटराव गावडे, सुरेश घुले, जालिंदर कामठे, विश्वास देवकाते, अर्चना घारे, प्रकाश म्हस्के, विजय कोलते आदी उपस्थित होते.
शेती घटली, औद्योगिक उत्पादन घटले आणि रोजगारपण मिळत नाहीत. साडेचार वर्षे तुमचे सरकार आहे. मग इतके दिवस काय केले. न्यायदेवतेवर अन्याय झाला आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेत आहेत. असे यापूर्वी कधीच झाले नव्हते ते पहिल्यांदा झाले, असे पवार यांनी सांगितले.
निवडणुका आल्या की भाजपाला राममंदिराची आठवण येते. मंदिराच्या नावाखाली हे सर्व उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनीच आता अन्याय सुरू केला आहे. दुष्काळातून लोकांना बाहेर काढण्याचे काम आम्ही केले. मात्र हे सरकार त्याचा विचार करीत नाही. एकीकडे मुख्यमंत्री आरक्षण देतात, तर दुसरीकडे त्याच पक्षाचे प्रमुख तेलंगणात सांगतात, की ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हे वेडेपणा आहे. ते टिकणार नाही, असे पवार म्हणाले.
एक तरी पत्रकार परिषद घेतली का?
देशाच्या पंतप्रधानांनी एक तरी पत्रकार परिषद घेतली आहे का? असा सवालही पवार यांनी केला. एवढे आरोप झाले असताना वास्तव सांगण्याची ताकद या राज्यकर्त्यांमध्ये नाही. राफेलप्रकरणी खूप आरोप झाले. मात्र पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्र्यांनी एक शब्द काढला नाही. राफेल विमान खरेदी आघाडीच्या काळात किंमत ४५० कोटी होती. तीच किंमत १६०० कोटींपर्यंत कशी गेली? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.
जाती-जातीमध्ये अंतर वाढवले जात आहे. राजस्थानमध्ये राजपूत आणि जाट यांच्यात अंतर आहे. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांच्यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका पवारांनी केली.