पुणे - शाळांमध्ये सरस्वती, शारदा मातेचा फोटो कशाला, त्यांची पूजा का करायची असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यावरून भाजपाने राष्ट्रवादीला टीकेचं लक्ष्य केले. या प्रकरणावरून होणारा वाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेसनं हात झटकले आहे. छगन भुजबळांचे ते विधान ही राष्ट्रवादीची भूमिका नाही असा स्पष्ट खुलासा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळांनी केलेले विधान वैयक्तिक आहे हे पक्षाने स्पष्ट केले आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पक्षाची ती भूमिका नाही. भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली आहे. राज्यात आज बेरोजगारी, महागाईचा प्रश्न आहे. वेदांतासारखा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला. त्यामुळे दीड दोन लाख तरूणांना रोजगारापासून मुकावं लागलं आहे. त्याबाबत सत्ताधाऱ्यांनी बोलले पाहिजे असंही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी आम्हाला कधी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त ३ टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला होता.
भुजबळांच्या विधानावरून मुख्यमंत्र्यांचा टोलाया वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शाळेतून सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही. जे लोकांना वाटते, तेच आम्ही करणार असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळांना लगावला होता.
ब्राह्मण महासंघाने घेतला होता आक्षेपराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी हिंदु धर्मीयांचा अपमान केला आहे. कुठल्याही महापुरुषाचा अपमान कुणीही केला नाही. परंतु जाणूनबुजून भुजबळांनी शाळेत सरस्वती, शारदा मातेचा फोटो का असावा? असे तारे तोडले आहेत. हिंदु महासंघ या विधानाचा आक्षेप करतो. महाराष्ट्रात विरोधी पक्षात आल्यानंतर जातीवाद करायचा हे राष्ट्रवादीचं जुनं धोरण छगन भुजबळ अंमलात आणत आहेत. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असं विधान ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"