मुंबई - ठाकरे सेनेला आता एका मांडीवर राष्ट्रवादीनं बसवलंय तर दुसऱ्या मांडीवर काँग्रेसनं बसवलंय. ठाकरे सेनेला दत्तक घेतलं आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष उघडपणे राष्ट्रवादी शिवसेना असल्याचं विधान केले आहे. ठाकरे सेनेला कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय. ज्या बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला त्यांच्या मुलाला आणि नातवाला त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे इतरांचा आधार घ्यावा लागतो ही खरी शोकांतिका आहे अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणी जेव्हा चर्चा सभागृहात सुरू होती. तेव्हा या प्रकरणात जी नवीन माहिती समोर आली आहे. पूर्वीच्या तपासात ज्या बाबी समोर आल्या नव्हत्या किंवा जाणीवपूर्वक आणल्या नाहीत. त्या माहितीची चौकशी करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं. तपासून घ्यायच्या अगोदरच नाना पटोले कुठल्या आधारे माहिती खोटी असल्याचा दावा करतात. तपास यंत्रणेचा अहवाल पुढे आल्यावर त्यावर भाष्य करता येईल असं प्रत्युत्तर त्यांनी नाना पटोलेंना दिलं.
तर चिखलफेक तुमचे तीन पक्ष करतायेत. तुमचीच महाविकास आघाडी आहे. धोरणात्मक, राजकीय विषयांवर सभागृहात चर्चा करायची असेल. काही सकारात्मक विषय मांडायचे असतील. सकाळी ८ वाजल्यापासून रोज टीव्हीवर येऊन बोलतात. साडेतीन महिन्याचा कालावधी सोडला तर रोज त्याच विषयांवर बोलतात. लोकं राऊतांचे एका कानाने ऐकतात अन् दुसऱ्या कानानं सोडून देतात असा टोला शंभुराज देसाईंनी संजय राऊतांना लगावला.
दरम्यान, २ वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भात आले नाही. विदर्भ, मराठवाड्याचे प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू आहे परंतु विरोधक चर्चेत सहभागी होत नाही. पहिला आठवडा पार पडला. समर्पक उत्तरे सगळ्यांना दिली. सभागृह सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात असतात. आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. आम्ही आमचे काम करू असंही शंभुराज देसाई म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?अधिवेशनात काहीही गाजत नाही. केवळ चिखलफेक केली जात आहे. भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. कुठलेही सरकार इतक्या सूडबुद्धीने वागले नाही. या प्रकरणात भाजपाला जे हवे तेच घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा मागे पडला. मंत्र्यांविरोधात SIT स्थापन करा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असं संजय राऊतांनी म्हटलं.