गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र झाला आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या या मागणीवरून राज्यात मराठा आरक्षण समर्थक विरुद्ध ओबीसी आरक्षण समर्थक असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान, संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मराठा समाजाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
आरक्षणाबाबत आपलं मत मांडताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, मराठा समाजानं ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल. ओबीसी आरक्षणापैकी १८ ते १९ टक्के वाटा हा कुणबी समाज घेतो. मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये आल्यास मराठ्यांना खूप कमी वाटा मिळेल. त्यामुळे आर्थिक निकषावर मिळणाऱ्या १० टक्के आरक्षणापैकी आठ ते साडे आठ टक्के वाटा मराठा समाजाला मिळू शकतं, असं दिसत आहे, असे निरीक्षण गायकवाड यांनी नोंदवलं. गायकवाड यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात वाढलेली आर्थिक असमानता हे आरक्षणाच्या मागणीमागचं मूळ कारण आहे. त्यामुळे सरकारने धोरणात बदल करण्याची गरज आहे, असं मत प्रवीण गायकवाड यांनी मांडलं आहे.
दरम्यान, आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आलेले दिसले. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास वडेट्टीवार यांनी विरोध केला. ते म्हणाले की, जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सर्व काही ठरवू नये, अभ्यास करुन तरुणांनी निर्णय घ्यावा, असं आवाहन वड्डेटीवार यांनी केलं. ज्या ठिकाणी नोकऱ्यांचा आणि सोयी, सवलती यांचा संदर्भ येतो तिथे मोठं नुकसान होणार आहे. अशा परिस्थीतीत मराठा तरुणांनी अभ्यास करुन आपण कोणाला साथ देत आहोत. आपलं भलं काय आहे याचा विचार करावा, असा सल्लाही वड्डेटीवार यांनी दिला होता.
त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले होते. विरोधी पक्षनेता आणि विधिमंडळ हे न्यायमंदिर आहे. आता त्यांना स्वत:च्या जातीविषयी गर्व झालाय, असा घटनेतला विरोधी पक्षनेता असतो का? सरकारनं न्याय दिला नाही तर विरोधी पक्षनेता प्रचंड मोठा आवाज उठवतो आणि सरकारला झुकवतो. तुमचे विचार कसे पाहिजे, राहुल गांधींनी हे शिकवले का? मराठ्यांविरोधात आवाज उचलतो, त्यासाठी राहुल गांधींनी पद दिलंय का असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला.