पुणे - शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते ओबीसींसोबत नाहीत ही भूमिका स्पष्ट केलीय. ओबीसींचे किमान १०० आमदार विधानसभेत निवडून यायला हवेत अन्यथा ओबीसी आरक्षण धोक्यात आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार हे जरांगे पाटील यांच्यासोबत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या जरांगेंच्या मागणीला पवारांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते प्रयत्न करतील. ओबीसीचे आरक्षण ज्या तत्वांवर सुप्रीम कोर्टात थांबवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ओबीसी इम्पिरियल डेटा नसल्याने शिक्षण, नोकरीतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती विधानसभेच्या माध्यमातून देतील असा आमचा अंदाज आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय आरक्षण वाचवायचं आहे का हे ओबीसींनी ठरवले पाहिजे. जर आरक्षण वाचवायचे असेल तर किमान १०० ओबीसी आमदार या विधानसभेत निवडून आले पाहिजेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते ओबीसींसोबत नाहीत ही भूमिका स्पष्ट केलीय. मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी मराठ्यांना केंद्राकडून टक्केवारी वाढवून घ्या आणि ओबीसीतून आरक्षण मिळवा असं म्हटलं होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही ओबीसींची मागणी त्यांना मान्य नाही. वंचित बहुजन आघाडी ओबीसींसोबत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.
एन्काउंटर प्रकरणी सरकारने खुलासा करावा
दरम्यान, बदलापूर प्रकरणातील आरोपीनं बंदूक हिसकावली, ३ गोळ्या झाडल्या त्यात एक पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. संशयाचं वातवरण दूर करण्यासाठी शासनाने ज्या पोलिसाला गोळीबार केला त्याचा मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा. जेणेकरून मांडीला गोळी लागली म्हणजे नेमकं कुठे लागली हे समोर आणावे. त्यातून या एन्काउंटरबाबत जे काही चर्चा, संशयास्पद गोष्टी समोर येतायेत, त्याला पूर्णविराम लागेल. नेमकं आरोपीला कुठे घेऊन जात होते, याचाही खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला पाहिजे. जर खुलासा केला नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी शासनाने हा बळी दिलाय का असं लोकांना वाटेल. त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात न अडकता शासनाने वस्तूस्थिती मांडावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी सरकारकडे केली.