गौरीशंकर घाळे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील १४ महापालिकांसह स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येणार नाहीत. महिनाभर निवडणुकीचा कार्यक्रम चालण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुटीत अनेकजण बाहेरगावी जातात, त्यामुळे शाळांचे निकाल लागण्याआधी निवडणूक घेण्याचा आग्रह राजकीय पक्षांनी धरला असून, त्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पण या सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील १४ महानगरपालिका, २०८ नगर परिषदा, १४ नगर पंचायती, २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमयासाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बुधवारी (दि. २) बैठक झाली. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, सीपीआय आणि बसपाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका एकत्र घेता येणार नाहीत. महिनाभर निवडणुका चालण्याची शक्यता असून, सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर करायचे, की जशा निवडणुका होतील तशा घोषित करायच्या, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. नंतर एकाचवेळी निकाल देण्याकडे सर्व पक्षांचा कल होता, असे समजते.
येत्या एक-दोन दिवसांत प्रभागांचे सीमांकन अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरक्षण सोडत प्रक्रिया होईल. उन्हाळी सुटीत अनेक नागरिक बाहेरगावी जातात. त्यामुळे शाळांचे निकाल लागण्याआधी निवडणुका पार पाडण्याची मागणी पक्षांनी केली. तर निवडणुकांची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी विविध सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. अद्ययावत माहितीकरिता आयोगाच्या संकेत स्थळासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा असेल. निवडणूक खर्च सादर करणे, मतदारांना उमेदवारांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी; तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर मोबाइल ॲपचीही सुविधा असेल, असे मदान यांनी यावेळी सांगितले.