ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा होत आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी म्हणून आपण पुढे जातोय. काँग्रेस फोडतोय असं नाही असं स्पष्टच सांगितलं. "जगताप कुटुंब शिवसेनेच्या कुटुंबात आलं. त्यांचं शिवसेनेत स्वागत आहे. जगताप कुटुंबाने ऐतिहासिक मैदानात सर्वांच्या साक्षीने प्रवेश घेणार असा हट्टच धरला. काहींच्या भुवया उंचावल्या. आमच्यातला गद्दार घेऊन भाजपावाल्यांनी डोक्यावर चढवला पण स्नेहलताईंना काहीही न देता त्या आमच्याकडे आल्यात" असं म्हणत भाजपा आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.
"काहींच्या पोटात गोळाही आला की पुढच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त. काँग्रेसमधून शिवसेनेत आले शिवसैनिकांचं काय होणार? आमच्यातला गद्दार घेऊन भाजपाने डोक्यावर नाही का चढवला" असंही ते म्हणाले. येत्या काही महिन्यांत आणखी काही जण येणार आहेत. मविआ म्हणून आपण पुढे जातोय म्हणजे आम्ही काँग्रेस फोडतोय असं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
"सत्ता असते... त्या सत्तेकडे सर्वजण जातात. पाठीवर वार आपल्याच लोकांनी केला. भाजपाने त्यांना फूस लावली. बारसूच पत्र उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. पण मी दिलंच होतं पत्र... खोटं बोलायची मला सवय नाही. प्रकल्प येणार माहीत होतं. तेव्हा हे नागोबा मालक म्हणून तिथे बसले आहेत. शिवसेना संपवली पाहिजे असं अनेकांना वाटतंय, तर काहींना आपण म्हणजे शिवसेना असंच वाटतंय. माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींच्या घशाखाली घास उतरत नाही."
"माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना भाकरच मिळत नाही. मी मुख्यमंत्री असताना रिफायनरी नाणारवरून हाकलून दिली. मुख्यमंत्री सूरत, गुवाहाटी असं सगळीकडे जातात. दिल्लीच्या वाऱ्या करतात पण तळीत येण्यासाठी विस्मरण झालं आहे. पंतप्रधानांनी १०० वेळा मन की बात केली. महागाई कमी झाली?, नोकऱ्या मिळाल्या? अच्छे दिन आले?. अनेक योजनांची नावं आपण विसरलो... कोणी विचारलं तर तो देशद्रोही" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.