मुंबई - लोकसभा निवडणुका लागणार आहेत. ४०० पार जागा निवडून आणणार आहोत अशी मोदींनी घोषणा केली आहे. आता या ४०० पैकी ४८ जागा या महाराष्ट्रात आहेत. या जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी लोकांना केलं आहे.
मुंबई मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत ते बोलत होते.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ४०० पैकी ४८ जागा कमी झाल्यानंतर ३५२ जागा राहतात. त्यामुळे ४८ जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या ४८ जागा आपण कमी करूया. उद्या युती होईल की नाही हे डोक्यातून काढून टाका. झाली तर फार चांगली आणि नाही झाली तरी आपल्याला लढायचं आहे हे लक्षात असलं पाहिजे. जेवढ्या ताकदीने आपण उतरू. तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष, समुह जो भाजपाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे युती झाली तर युतीत अन् नाही झाली तरी आपणच लढणार असंही त्यांनी सांगितले.
त्याशिवाय मोदी असेल अथवा भाजपा यांना अंगावर आपणच घेतोय. इतरांचे फक्त खोके चाललेत, त्यापलीकडे काहीच चालले नाही. विचारांची लढाई ही आपण उभी करतोय. मोदी घराणेशाहीवर बोलतात. देशातील जनता हा माझा परिवार आहे असं सांगता, मग हे खरे असेल तर एकच गोष्ट त्यांनी करावी. निवडणूक प्रतिज्ञापत्रात तुम्ही लग्न झाल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे त्या महिलेले एक दिवस तरी पंतप्रधान निवासस्थानी ठेवा. मग तुम्ही १४० कोटी लोकांचा बाप आहात हे म्हणू. राजकीय घराणेशाहीवर मोदी बोलतात. पण समाजव्यवस्थेत घरातील जी व्यवस्था आहे. ती आपण पाळत नाही अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
दरम्यान, जुनागड येथील बंदरात १९ हजार कोटींचा नार्कोटीक्सचा ड्रग्स साठा सापडला. ज्याचा मालक अफगाण दाखवला जो फाटका आहे. आपली सत्ता गेली आणि उद्या चौकशी झाली तर आपण जेलमध्ये जाऊ शकतो त्यामुळे ते लटलट कापायला लागलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचा झेंडा दिसत नाही. भाजपाचं नाव दिसत नाही. सबकुछ मोदींच्या नावावर अशी परिस्थिती आहे. २०२४ च्या निवडणुकीत मोदी निवडून आले तर त्यांचे वागणे व्यापाऱ्यांच्या मागे ईडी,सीबीआय, पोलीस लावणे असं आहे. उद्या मुलुंडमधील व्यापाऱ्यांच्या घरावर धाडी पडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.
..तर राहुल गांधींना पुढे करू नका
काँग्रेसवाल्यांना सांगणं आहे, मोदींना अंगावर घ्यायचे असेल तर राहुल गांधींना पुढे करू नका. प्रियंका गांधींना पुढे करा. ती बरोबर त्याचे ४-५ वाजवत असते. मोदींची पोलखोल करणे हे महत्त्वाचे आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.