नांदेड - देशाची ४ लाख १० हजार मेगावॅट पॉवर क्षमता आहे. २ लाख १५ हजार मेगावॅटपेक्षा कधीही जास्त वापर विजेचा होत नाही. ४० हजार मेगावॅट वीज उत्पादन करणारे कारखाने देशातील विविध भागात आहे. पण तरीही कुठल्याही राज्यात २४ तास वीज मिळत नाही. अनेक राज्यात शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कधी दिवसा तर कधी रात्री लाईट येते. लांबलचक भाषण, खोटी भाषणे कितीदिवस ऐकत राहणार? असं सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, वीज खासगीकरण केल्यास आम्ही सत्तेत आल्यावर पुन्हा परत घेऊ. ९० टक्के वीज कंपन्यांचे सरकारीकरण होईल. आम्ही तेलंगणा राज्यात ते करून दाखवलंय. जर देशाची जनता आम्हाला संधी दिली तर २ वर्षात देशात उच्च गुणवत्तेची वीज २४ तास देऊ. आम्ही हे राज्यात केलेय. देशात तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे २४ तास वीज दिली जाते असं त्यांनी सांगितले.
कोळसा आयात करण्याची गरज काय? कोळसा आयात करायची गरज का? जेवढे अदानीवर प्रेम तितके देशातील जनतेवर का नाही? केंद्रानं राज्यांना कोळसा आयात करण्याचे निर्बंध घातलेत. कोळसा देशात इतक्या प्रमाणात आहे तरी देशात बाहेरून कोळसा आयात करावा लागतो. देशात २-३ रेल्वे रुळ बनवले तर कोळसा वाहतूक करण्यात सोप्पं जाईल. १ किलोही कोळसा आयात करण्याची देशात गरज नाही. राज्यांना बळजबरीनं कोळसा खरेदी करायला सांगितले जाते. त्यामुळे परिवर्तन होणं काळाची गरज आहे असंही मुख्यमंत्री केसीआर म्हणाले.
जनता पाण्यापासून वंचित का? सरकार दमदार असेल आणि रणनीती बदलेल तर प्रत्येक एकरला पाणी देऊ शकतो. पाणी मुलभूत गरज आहे. देशात पाण्याची कमतरता आहे. दुषित पाणी पिऊन लोकांचं आरोग्य बिघडत आहे. पाण्यासाठी युद्ध करण्याची देशात गरज आहे का? राज्याराज्यांमध्ये पाण्यावरुन लढाई सुरू आहे. भरपूर पाणी प्रत्येक एकरला देऊ शकतो. पाणी संपत्ती निसर्गाने दिलीय मग जनता यापासून वंचित का? पुढील १०० वर्ष शुद्ध पाण्याची कमतरता देशाला भासणार नाही. संपत्ती राहूनही पिण्याच्या पाण्यापासून देश तरसतो आहे. बीआरएस जर सरकार बनवेल तर पाण्याचे धोरण राबवेल असंही केसीआर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.