ज्ञानेश्वर भंडारे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: भाजपच्या एका आमदाराच्या विधानामुळे त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला माफी मागावी लागते, हे त्यांचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरून भाजपवर केली आहे.
शिवसेना नेते अंबादास दानवे शनिवारी (२३) खासगी कार्यक्रमानिमित्त पिंपरी-चिंचवड दौ-यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. कोणीही खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे योग्य नसल्याचे सांगत दानवे म्हणाले, मुस्लिम आरक्षणाबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तसेच मनोज जरांगे यांच्या मागण्या मर्यादित आहेत. केंद्र सरकारने निर्णय घेऊन मराठा आरक्षण देणे गरजेचे आहे. सरकारने साडेनऊ वर्षात धनगर समाजाला आरक्षण दिलेले नाही.
राज्यात सरकारी शाळांचे होणारे खासगीकरण हे चुकीचेच आहे. शिक्षणसम्राटांची घरे भरण्यासाठी हा घाट घालण्यात येत आहे. तसेच, नागपूरच्या पुरस्थितीवरून बोलताना घर पोकळ वासा, मुंबईची तुंबई झाली, अशा टीका करणे सोप्पं आहे. आता त्यांनी २५ वर्ष काय अंडी दिली का ? मोठे नेते आणि राज्याचे नेतृत्व करणा-या नेत्याच्या नागपूर शहराचे काय हाल झाले आहेत हे बघा, अशी टीका दानवे याांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता यावेळी केली.