जमीर काझी, मुंबईपोलिसांना आता पदोन्नती आणि अन्य तत्सम लाभापासून आता त्यांना वंचित राहावे लागणार नाही. कारण या पुढे त्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल (एसीआर) आता निर्धारित मुदतीत व पूर्णपणे लिहिले जाणार आहेत. राज्य पोलीस दलाचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांनीच त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांना आपल्या अधिकाऱ्यांचे २०१४-१५ या वर्षातील गोपनीय अहवाल येत्या ३१ डिसेंबरपर्यत लिहून पूर्ण करावे लागणार आहेत. अहवाल प्रतिवेदित व पुनर्विलोकित करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जावी आणि त्या बाबतच्या कार्यवाहीचा अहवाल पुढच्या वर्षी ६ जानेवारीपर्यंत आपल्या कार्यालयात सादर करावा, अशा सूचना पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केलेल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. महासंचालकांच्या या निर्णयामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. ९२ पोलीस उपनिरीक्षकांच्या गोपनीय अहवालाच्या मूळ नस्त्या गायब झाल्याची बाब नुकतीच उघड झाली होती. त्यामुळे अशा प्रकाराला कायमस्वरूपी प्रतिबंध बसून, अधिकाऱ्यांना त्वरित न्याय मिळेल, असे महासंचालक कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांचे प्रमोशन व आस्थापना विषयक अन्य लाभ देताना त्यांची सेवा ज्येष्ठतेबरोबरबच कामगिरी, कार्यपद्धती आणि वरिष्ठांनी दरवर्षीच्या गोपनीय अहवालात त्यांना दिलेले शेरे या बाबींचा विचार केला जातो. मात्र, बऱ्याच वेळा वरिष्ठ अधिकारी/ घटक प्रमुख या कामाकडे सोइस्करपणे दुर्लक्ष करतात. मर्जीतील अधिकारी, स्टाफशिवाय इतरांच्या ‘एसीआर’कडे दुर्लक्ष करतात किंवा अनेक वेळा अहवाल परिपूर्ण व व्यवस्थितपणे भरला न गेल्याने संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांना बढतीपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निराशा व नाराजीचे वातावरण असते. मात्र, खात्याच्या शिस्तीच्या बडग्यामुळे हे सहन केले जाते. महासंचालक दीक्षित यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर, त्यांनी उपनिरीक्षक ते वरिष्ठ भारतीय पोलीस अधिकाऱ्यांपर्यंतच्या गोपनीय अहवालाबाबत विशेष आदेश बजाविले आहेत.
पोलिसांचे ‘एसीआर’ मुदतीत लिहिणे बंधनकारक
By admin | Published: November 23, 2015 2:17 AM