पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी राज्यात विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आली आहे. मात्र, याच कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या महिलांसोबत विनयभंग,बलात्कार, महिला बेपत्ता होण्यासारख्या घटना घडत आहे. तसेच स्वाब चाचणीच्या नावाखाली भंडारा येथे घडलेल्या गलिच्छ व संतापजनक प्रकारासारख्या घटना सुद्धा अनेक ठिकाणी घडत आहे. कोविड सेंटरमधील महिलांवरझालेल्या अत्याचार प्रकरणी राज्य सरकारने आजपर्यंत किती दोषींवर कारवाई केली? कारवाई तर सोडाच मात्र मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना या घटनांवर व्यक्त देखील न व्हावेसे वाटणे हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पुण्यासह राज्यातील महिलांच्या कोविड सेंटरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य केले.
वाघ म्हणाल्या, मुख्यमंत्री ''माझे कुटुंब माझी जबाबदारी'' असे म्हणतात. पण राज्याचे कुटुंब प्रमुख देखील तेच आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील त्यांची आहे. मात्र ती कुठेही होताना दिसत नाही. वारंवार कोविड सेंटरमध्ये महिलांसोबत संतापजनक घटना घडत असताना सुद्धा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री गप्प आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा फक्त भाषणापुरती मर्यादित ठेवण्यापुरती आहे का ? असा सवाल वाघ यांनी उपस्थित करताना एवढ्या संख्येने महिला अत्याचाराच्या घटना घडल्यावरच आम्ही कारवाई करू असे तरी किमान एकदा जाहीर करून टाका, अशी बोचरी टीका देखील त्यांनी राज्य सरकारवर केली.
जम्बो हॉस्पिटलमधून एक तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटनेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले, पुण्यात अशाप्रकारची ही तिसरी घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासनाला ह्याबाबत काहीएक माहिती नाही. गेल्या काही महिन्यांपासून कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेची मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी केली गेली. मात्र त्याकडे राज्य सरकारने यावर काहीच कार्यवाही न करता फक्त दुर्लक्ष करण्याचे काम केले.