मुंबई : विनातिकीट प्रवास करताना अनेक प्रवासी एसटीतही आढळत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड वाहकालाही बसतो आणि चौकशीच्या फेऱ्यात वाहक अडकून निलंबित होण्यापर्यंतची कारवाई होते. तसेच पैशाचा अपहार केल्याचा ठपका वाहकावर येतो. काहीवेळा प्रवाशांकडूनच मुद्दाम तिकीट काढले जात नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अशा प्रवाशांवर वेगळ्यापध्दतीने कठोर कारवाई करण्याचा विचार एसटी महामंडळाकडून गांभीर्याने केला जात आहे. यात तिकीट न काढल्यास आगारात नेऊनच जबाब नोंदविण्यात येईल. त्यासाठी गृहखात्याशी सल्लामसलत केली जात असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. एसटीचा ६८ वा वर्धापन दिन मुंबई सेन्ट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजिंतसिंह देओल, महाव्यवस्थापक सुर्यकांत अंबाडेकर, वि.वि.रत्नपारखी यांच्यास अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. १९४८ साली स्थापन झालेली एसटी देशातील पहिली सार्वजनिक परिवहन संस्था आहे. या संस्थेला ६८ वर्ष झाली असून अविरतपणे सेवा दिल्याचा अभिमान आहे. या सेवेला महत्वाचा हातभार हा चालक आणि वाहकाचा लागतो. म्हणूनच प्रवासी वाढविताना या दोघांनाही फायदा मिळावा त्यासाठी दहा टक्के प्रोत्साहन भत्ता त्यांना देण्यात येत असल्याचे रावते म्हणाले. महत्वाची बाब म्हणजे तिकीटांच्या पैशाचा अपहार झाल्यावर नेहमी वाहक चौकशीच्या फेऱ्यात अडकतो. त्यांच्याबरोबर प्रवाशांवरही कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्याविषीय गांभीर्याने विचार केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या विनातिकीट प्रवाशांकडून फक्त दंड वसुल केला जातो.
फुकट्या प्रवाशांची खैर नाही
By admin | Published: June 02, 2016 2:20 AM