पुणे : प्रणव मुखर्जीं यांना राष्ट्रपती करायचे होते तेव्हा २००४ साली सोनिया गांधी यांनी सांगितल्यामुळे, शिवसेनेची मते मागायला शरद पवार मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर थेट आत्ता व गेल्या आठवड्यात तर दोन-तीन वेळा पवार मातोश्रीवर गेले आहेत. हे काही बरोबर नसून या वयात त्यांचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते. वारंवार पवार यांना मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लक्ष केले़ पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, उध्दव ठाकरे पंढरपूरसाठी बाहेर पडले तर मध्ये एकदा बांद्रा व गोरेगाव येथील तात्पुरत्या उभारलेल्या कोविड सेंटरच्या पाहण्यासाठीच गेले. या व्यतिरिक्त ते घराबाहेर निघालेले दिसत नाही. एकवेळ घराबाहेर नाही पडले तरी चालेल, पण मातोश्रीवरही ते कोणाला भेटायला तयार नाही. तसेच व्हीसीवर चर्चा केली म्हणून घरात बसून चालणार नाही़ व असेच करीत राहिला तर हे सरकार चालणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी, प्रशासनावर तुमचा धाक नसणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. जनतेच्या हितासाठी आम्ही सरकारबरोबर काम करायला तयार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दररोज दोन तास जरी बरोबर घेऊन काम केले असते तर कोरोना विरोधात आणखी प्रभावी काम झाले असते. परंतु, उध्दव ठाकरे कोरोनाविरोधातील कामकाजात कोणाचाही सहभाग घेण्यास तयार नाहीत असेही पाटील म्हणाले. -----------------मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका आवश्यक सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर स्टे आला तर तो उठविणे खूप कठीण जाईल. राज्य सरकार आरक्षण टिकविण्यासाठी काही करत नाही असे आमचे म्हणणे नाही. परंतु, मराठा समाजाला यापूर्वीच मागास आयोगाने मागस म्हणून घोषित केले आहे़ तसेच ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षणाचा मुद्दाही उच्च न्यायालयात गाह्य धरला. गेल्या असल्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडून, राज्य सरकारने आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका यापुढे घेतली पाहिजे. सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळ, मराठा आरक्षण या गोष्टी राजकारणाच्या वर असून, या समाजाच्या हितासाठी आम्ही राज्य सरकारबरोबर काम करण्यास तयार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने ज्या ६०५ अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क देण्यात येत होते. ते यंदाच्या शैक्षणिक वर्षात ओबीसी तून की उच्च शिक्षण योजनेतून देणार हे जाहिर करावे़ तसेच सारथीकडून देण्यात येणारी स्कॉलरशिप व फेलोशिपही चालू करून, महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या व्यावसायिक कर्जाचे वाटप वाढवून, १० लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी अधिकाधिक तरूणांना द्यावे असेही ते म्हणाले.
शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 6:35 PM
शरद पवार यांच्या वयाचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते...
ठळक मुद्देजनतेच्या हितासाठी आम्ही सरकारबरोबर काम करायला तयार आहोत.