ठाणे : लोकांच्या मनावर असलेले नरेंद्र मोदी नावाचे गारूड कमी होत चालले आहे. ते मोदींनी नाही तर आपणच निर्माण केलेय, त्यामुळे ते फेकून देण्याची जबाबदारीही आपलीच आहे, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली.दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित एकविसावा दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला. या वेळी ते बोलत होते. लेखिका शिल्पा कांबळे आणि चित्रकार सुधीर पटवर्धन यांना यंदाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध नाट्यलेखक, पटकथाकार संजय पवार, सुप्रसिद्ध कला समीक्षक सुधाकर यादव, डॉ. प्रज्ञा पवार उपस्थित होते.या समारंभात केतकर म्हणाले, मोदींच्या नावाचे गारूड कमी होत असेल, तर त्याचा परिणाम गुजरात, कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये दिसेल. आपण भाग्यवान असू तर २०१९ च्या निवडणुकांमध्येही दिसेल. त्याची सुरुवात झाली आहे. यशवंत सिन्हांनी मोदींबद्दल लिहिलेले उघड पत्र ही त्याचीच चिन्हे आहेत.आज सगळ्यात जास्त निषेध हा व्यंगचित्रातून व्यक्त होतो आहे. त्यामुळे कधी नव्हे ते पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल असलेले राज ठाकरे यांनी फेसबुकवर जाहीर केले की, व्यंगचित्रातून मी माझी भूमिका मांडणार. त्याची सुरुवात मोदींच्या विरोधात कठोर चित्र काढून केली. सुदैवाने त्यांना उपरती लवकर झाली असून ते जाहीरपणे क्षमा मागतात की, चुकलं माझं. तुमचं चुकलं पण आमची वाट लागली, अशा शब्दांत केतकर यांनी राज यांचीही खिल्ली उडवली. साहित्याबद्दल बोलताना लोकांची वेदना समजली, तर नव्या काळाचं प्रोटेस्ट लिटरेचर जन्माला येईल. सध्या सामाजिक परिस्थिती नाही तर आपण थिजलोय. वास्तव फेकून सत्य निर्माण करण्याची ताकद चित्र, कथा, कला, कादंबरीमध्ये आहे, असेही ते म्हणाले.सुधाकर यादव यांनी भारतीय चित्रकलेची परंपरा सांगत पटवर्धन यांच्या चित्रांची वेगळीकता अधोरेखित केली. पुरस्काराने आपल्यावरील दबाव वाढला असून अजून खूप काम करायचे आहे, अशा शब्दांत शिल्पा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कलाकारांनीच माझा केलेला सत्कार मला खूप महत्त्वाचा वाटतो, असे पटवर्धन म्हणाले.कुठे गेले अण्णा, आंदोलन आणि लोकपाल?अण्णा हजारे यांच्यासाठी ठाण्यात तेव्हा निघालेल्या मोर्चाने ट्रॅफिक जॅम झाले होते. सगळे जण ‘मी अण्णा’ अशा टोप्या घालून फिरत होते; पण अण्णा किती फ्रॉड आहेत, हे आम्ही सांगत होतो. कोणी ऐकत नव्हते. आता कुठे गेले अण्णा, त्यांचे आंदोलन आणि ६ वर्षे झाली, कुठे आहे लोकपाल? देशातील भ्रष्टाचार संपला आहे की, मोदींना सत्तेवर आणण्याची ती पूर्वतयारी होती, असा थेट सवाल केतकर यांनी उपस्थित केला.
मोदी नावाचं गारूड फेकून देण्याची जबाबदारी आपलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:33 AM