मुंबई : दिल्ली, बंगळुरू, मुंबईमध्ये ज्याप्रमाणे वाहतुकीच्या समस्या आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येते, तीच पद्धत पुण्यात वापरता येऊ शकते का, अशी विचारणा गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.राज्य सरकारने मुंबईत ई-चलान पद्धत सुरू केली. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या जंक्शनवर सीसीटीव्ही बसवले आहेत. हीच पद्धत पुण्यातही अमलात आणली जाऊ शकते, अशी सूचना न्या. व्ही.एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य सरकारला केली.पुण्यातही वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण वाढत आहे, याला आळा बसवण्यासाठी काय उपाययोजना आखणार, अशी विचारणा करत राज्य सरकारला २५ आॅक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.पुण्याच्या किशोर मनसुखानी यांनी केलेल्या जनहित याचिकेवर खंडपीठाने राज्य सरकारला वरील निर्देश दिले. पुण्यातील मोठ्या जंक्शनवर सीसीटीव्ही बसवण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवणे शक्य आहे का? - हायकोर्ट
By admin | Published: October 14, 2016 2:39 AM