मुंबई : रेमण्ड ग्रुपचे अध्यक्ष विजयपथ सिंघानिया आणि त्यांच्या चार नातवंडांमध्ये पूर्वजांच्या संपत्तीवरून सुरू असलेला वाद सामंजस्याने सोडवणे शक्य आहे का? अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने हा वाद मध्यस्थी करून सोडवण्याची सूचना दोन्ही पक्षांच्या वकिलांना केली.विजयपथ सिंघानिया यांचा मुलगा मधुपती सिंघानिया यांच्यात वाद झाल्याने मधुपती आणि त्यांच्या पत्नी अनुराधा सिंघानिया यांनी १९९८मध्येच पूर्वजांच्या संपत्तीमधील हिस्सा सोडून सिंगापूरला स्थायिक झाले. मात्र त्यांची चार मुले अनन्या (२६), रसलिका (२६), तारिनी (२०) आणि मुलगा रैवथरी (१८) यांनी पूर्वजांच्या संपत्तीत त्यांना हिस्सा मिळावा, यासाठी विजयपथ सिंघानिया यांना उच्च न्यायालयात खेचले आहे.याचिका प्रलंबित असेपर्यंत संबंधित संपत्तीवर तिसऱ्या पक्षाचे अधिकार निर्माण करण्यास स्थगिती द्यावी. तसेच आतापर्यंत सिंघानिया यांच्याकडे असलेल्या संपत्तीची यादी जाहीर करावी, अशी अंतरिम मागणी चारही नातवंडांनी उच्च न्यायालयात केली. मात्र २१ आॅगस्ट २०१५ रोजी उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने नातवंडांना दिलासा देण्यात नकार दिला.त्या आदेशाविरुद्ध चारही नातवंडांनी हायकोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते - ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती.खंडपीठाने २१ आॅगस्टचा निर्णय योग्य ठरवत अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. ‘या टप्प्यावर एकसदस्यीय खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही,’ असे म्हणत न्या. कानडे यांनी या याचिकेवरील अंतिम सुनावणी ६ एप्रिल रोजी ठेवली.आतापर्यंत हे प्रकरण मध्यस्थी करून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला का? अशी विचारणा खंडपीठाने केल्यावर नातवंडांची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलांनी हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करू, असे म्हटले.‘आजोबांनी नातवंडांसाठी थोडा स्नेह दाखवावा. बघू या, कोण माघार घेतं?’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी ६ एप्रिल रोजी ठेवली. (प्रतिनिधी)
सामंजस्याने वाद सोडवणे शक्य आहे का?
By admin | Published: February 06, 2016 3:30 AM