सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या यशवंत जाधव यांनी गेल्या दोन दशकांमध्ये महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सलग चारवेळा त्यांना अध्यक्षपद देण्यात आले. मात्र ठेकेदाराला त्यांच्या वॉर्डात काम करण्यास विरोध करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जाधव अडचणीत आले.
माझगाव, ताडवाडी येथील सफाई कामगाराच्या कुटुंबातील यशवंत जाधव यांचा जन्म आहे. १९७८ मध्ये त्यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राजकारणाला सुरुवात केली. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. २००२ मध्ये नगरसेवक पदाची संधी हुकल्याने जाधव यांनी उपविभागप्रमुख पदाचे काम पहिले. २००७ मध्ये पक्षाने संधी दिली व ते पुन्हा निवडून आले, तर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांना सलग दोन वर्षे उद्यान व बाजार समितीचे अध्यक्षपद मिळाले.
२०१२ मध्ये त्यांच्या पत्नी यामिनी जाधव निवडून आल्या, तर त्यांचा मात्र पराभव झाला होता. यामिनी जाधव महापौर पदाच्या स्पर्धेत होत्या, मात्र त्यांना संधी नाकारली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून निवडून आल्या, तर २०१७ मध्ये यशवंत जाधव तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. त्यामुळे शिवसेना पक्षाने त्यांच्यावर सभागृह नेतेपद सोपविले. त्यानंतर २०१८ पासून सलग चार वर्षे ते स्थायी समिती अध्यक्ष आहेत.
ऑडिओ क्लिपमुळे जाधव अडचणीत भायखळ्यामध्ये काम करणाऱ्या ठेकेदाराला प्रकल्पातून माघार घेण्यासाठी त्यांनी धमकावल्याची ऑडिओ क्लिप २०२० मध्ये व्हायरल झाली, तर जाधव यांच्यावर असमान निधी वाटपाचा आरोप भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला होता. तर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवल्याचा आरोप झाल्याने त्यांची चौकशी झाली होती. तसेच जाधव दाम्पत्यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.